दिल्ली :- शहरात नवीन बँक (Bank) सुरु झाली आणि खाते उघडण्यासाठी जोरदार ऑफर (Offers) असतील तर एकदा शहानिशा कराच. कारण एका पठ्याने चक्क बोगस बँक (Bogus Bank) सुरु केली. तिच्या 9 शाखाही सुरु केल्या. अनेकांना चूना लावला. त्याचे हे मायाजाल वाढण्याअगोदरच पोलिसांनी (Police) त्याला अलगद उचलले..
तर फसवणुकीचा हा प्रकार तामिळनाडू राज्यात उघड झाला. या प्रकाराने पोलिसही चक्रावले. तर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला. चक्क बोगस बँकेत आपले खाते असल्याचे समजल्यावर गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.
ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत. एटीएम फ्रॉड, फोन करुन फसवणूक, अॅपच्या मदतीने फसवणुकीचे प्रकार आपण आजुबाजूला पाहतोच. पण या पठ्याने केलेला हा प्रकार धक्कादायकच नाही तर प्रशासनालाही घाम फोडणार आहे..
ग्रामीण आणि शेतकी शेतकरी सहकारी बँक (Rural and Agricultural Farmers Cooperative Bank) असे या बनावट बँकेचे नाव आहे. आतापर्यंत बनावट कागदपत्रे, सिम, पासबूक, खाते, नोटा असे प्रकार होत होते. येथे तर बँकचं बनावट असल्याचे उघड झाले.
700 रुपये भरुन या बनावट बँकेत खाते उघडता येत होते. खाते उघडल्यावर ग्राहकांना क्रेडिट-डेबिट कार्ड ही देण्यात येत होते. तसेच इतर बँकेसारख्याच सुविधाही देण्यात येत होत्या. या बँकेत 3000 जणांनी खाते उघडले होते.
रिझर्व्ह बँकेच्या AGM ने बँकेविरोधात तक्रार दिली होती. केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) याप्रकरणी सखोल तपास केला. त्यानंतर या बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड चंद्रबोस याला अटक केली.