– गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचे उद्घाटन
नागपूर :- एखादी संस्था बुडायला फार वेळ लागत नाही. पण संस्था उभी करण्यासाठी, लोकांमध्ये संस्थेप्रती विश्वास निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. सहकार क्षेत्रातील संस्थांसाठी तर विश्वासार्हता आणि गुणवत्ता हेच सर्वांत मोठे भांडवल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
मानेवाडा येथे गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालक संचालक मोहन पडोळे, माजी अध्यक्ष लाहोटी, चिटणीसपुरा बँकेचे अध्यक्ष रविंद्र दुरुगकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘६३ वर्षांपासून गांधीबाग सहकारी बँक लोकांना सेवा देत आहे. मी स्वतः ४० वर्षांपासून बँकेची विश्वासार्हता अनुभवतोय. एकेकाळी तर बँकेचा एनपीए शुन्य टक्के होता. या यशाचे श्रेय बँकेच्या नेतृत्वाला जाते.’
‘मी स्वतः काही काळ सहकार चळवळीत काम केले. पण एकदा शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांनी मला सहकार चळवळीतील नेतृत्वाचे महत्त्व समजावून सांगितले होते. त्यांनी नेतृत्वाची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले होते, याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.
विदर्भात सहकार क्षेत्रात कर्मचारी आणि संचालकांना उत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. निर्णयक्षमता, टीम वर्क याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्याचा नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्राची सहकार क्षेत्राची परंपरा मोठी आहे. देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे, असेही ते म्हणाले.