नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेतर्फे लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या मंगळवारी झोन अंतर्गत लक्ष्मी लॉन, गोरेवाडा, के.आर. सी लॉन गोरेवाडा आणि आमराई लाँन यांच्या विरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु २५ हजार प्रत्येकी असे रु ७५,००० चा दंड लावण्यात आला. मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी नुकतेच एक आदेश काढून लग्न समारंभात ५० लोकांची उपस्थितीचे बंधन घातले आले. तसेच मंगलकार्यालय, लॉन मालकांना त्यांच्याकडील आयोजनाची माहिती संबंधित झोनला देणे आवश्यक आहे.
मनपाच्या उपद्रव शोध पथकाने या संबंधीची कारवाई केले आहे. यात मंगल कार्यालय, लॉन मालकाला रु १५,००० प्रत्येकी आणि कुटुंब प्रमुखांवर रु १०,००० दंड करण्यात आला. तसेच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई शुक्रवारी (७ जानेवारी ) रोजी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.
गांधीबाग झोन अंतर्गत ईतवारी मार्केट येथील मे.विनोद प्लास्टीक दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय उपद्रव शोध पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत पुजा कलेक्शन ॲण्ड स्टेशनर्स भारत मातानगर, हुडकेश्वर येथून १२ प्लास्टिक पतंग जप्त केल्या व १ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५४ पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.