-त्रिसुत्री पालन आवश्यक
नागपूर,दि,25: कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये व्यापारी संघटनेने अपेक्षित सहकार्य केले आहे, असे सहकार्य ओमिक्रॉन कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. अजूनही काही दुकानदार व त्यांचे मालक विनामास्क दुकानात वावरतांना दिसतात. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही असे वागणे म्हणजे या लाटेस प्रोत्साहनच आहे. सर्व व्यापाऱ्यांनी याची दखल घेऊन दुकानात आलेल्या ग्राहकाचे स्वागत करुन त्यांना मास्क लावण्याविषयी प्रोत्साहित करावे. त्याच बरोबरच ग्राहकांना मोफत मास्कचे वितरण करुन सेवा व उदारतेच्या दृष्टीकोनातून या लढाईत सहभागी व्हावे, तरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोनासंदर्भात व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल, पोलीस उप अधीक्षक संजय पुरंदरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, व्यापारी संघटनेचे प्रदीप खंडेलवाल, राजीव जैस्वाल,अश्वीन मेहाडिया,चंद्रशेखर शेगावकर, दिपेन अग्रवाल, प्रताप मोटवाणी, राजेंद्र कावडकर, रजवंतसिंग तुली, सुभाष मंगताणी, रामअवतार तोतला,आलोक संघवी, संजय नाबीस तसेच टास्क फोर्सचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
जे दुकानदार कोरोना नियमावलीचे पालन करणार नाहीत, त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल. मास्क व सॅनिटाईझरचा वापर त्याचबरोबर सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन आवश्यक असून त्यामुळेच आपण या लाटेपासून सुरक्षित राहू शकणार आहोत, असे डॉ. राऊत म्हणाले. ज्याचे अजूनपर्यंत लसीकरण झाले नाही त्यांनी तत्काळ लसीकरणाचा डोस घ्यावा. स्वत: काळजी घ्या व दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा, असे त्यांनी सांगितले.
बुस्टर डोससाठी पात्रताप्राप्त नागरिकांनी लसीकरण करावे. ही परिस्थिती नियंत्रणात येताच सर्व काही मोकळे करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यापारी संघटनेने रामअवतार, तोतला,श्री.अग्रवाल,राजीव जैस्वाल, तुली यांनी याविषयी जनजागृती आवश्यक असून काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. शाळा,कोचीन क्लास आदीबाबत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या.