उपद्रव शोध पथक, सफाई कर्मचा-यांसह बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा समावेश
नागपूर : कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता पुढील धोका टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी पुढे येण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून आता नागरिकही कोरोना चाचणीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये मनपाच्या कर्मचा-यांनीही पुढाकार घेतला आहे.
बुधवारी (ता.८) मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, सफाई कर्मचा-यांसह अन्य कर्मचा-यांनीही कोरोना चाचणी करून घेतली. याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही शहरातील विविध भागात असलेल्या चाचणी केंद्रांवर जाउन चाचणी केली. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागातर्फे चाचणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे शहरातील बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, उद्यान, दुकाने, मंगल कार्यालय, खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांची चाचणी सर्व दहाही झोनमध्ये करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या चमूद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून मनपा हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांचे निदान करणे गरजेचे आहे. शहरात विविध ठिकाणी काम करणारे, बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांमध्ये लक्षणे दिसत नसले तरी ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकते, त्यांची वेळीच चाचणी करून कोरोना वर नियंत्रण करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.