कोरोना रुग्ण संख्येत वाढ; जमावबंदी लागू, प्रशासन सतर्क

-नवीन वर्षाच्या पाटर्यावर बंदी

– कोविड वार्ड तयार ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

-रात्री नऊ नंतर दुकाने बंद, लग्नासाठी मर्यादित उपस्थिती

-यात्रा, रॅली बंद; रेस्टोरेंट, उपहारगृहे फक्त नऊ वाजेपर्यंत सुरू

नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णाची वाढ झपाट्याने होत आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. यासोबतच जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत कोविड वॉर्ड पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या.

आज जिल्हा प्रशासननाने तातडीची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना व आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याबाबत प्रत्येक विभागाला निर्देश देण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) विजय मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

राज्य शासनाने जमावबंदीचा घेतलेला आदेश लक्षात घेता नागपूर मध्ये देखील रात्री नऊ ते सकाळी सहा जमावबंदी लागू करण्याचे यावेळी एकमताने ठरले. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रार्दुभाव रोखण्यासाठी बृहन्मुबई महानगरपालिका यांनी निर्गमित केलेल्या आदेशाच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यात देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या पाटर्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपुरात गेल्या काही दिवसात रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेने लक्षात आणून दिले. राज्य शासनाने देखील गेल्या आठवड्यात रुग्ण संख्या गतीने वाढ होत असल्याचे निर्देशास आणले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, यंत्रणा तयार असणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठकीत ओमायक्रॉन विषाणू संसर्गाबाबतही आढावा घेण्यात आला.

जमावबंदी लागू

नागपूर जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच गर्दी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जारी केले. यामध्ये दुकाने व शॉपिंग मॉल रात्री नऊपर्यंत सुरु असतील. सिनेमागृह, नाट्यगृह रात्री नऊपर्यंत क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरु असतील. सिनेमाचा प्रयोग रात्री नऊपर्यंत असेल. रेस्टॉरंट, उपहारगृहे रात्री नऊपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रात्री नऊवाजेपर्यंत असतील. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, मेळावा यांना देखील रात्री नऊ वाजेपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. बंदिस्त जागेच्या 50 टक्के उपस्थितीत हे कार्यक्रम घेता येतील. तथापि, या कार्यक्रमाची कमाल मर्यादा 100 पेक्षा अधिक असता कामा नये. खुल्या जागेवर हे कार्यक्रम होत असल्यास क्षमतेच्या 25 टक्के मात्र 250 पेक्षा अधिक संख्या असता कामा नये.

विवाह सोहळ्यांमध्ये देखील बंदिस्त जागेसाठी 100 आणि खुल्या जागेत 250 लोकांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 50 व्यक्तींची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांसाठी 100 लोकांची मर्यादा बंदिस्त जागेसाठी व 250 लोकांची मर्यादा खुल्या जागेसाठी निर्धारित करण्यात आली आहे. व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, योगा सेंटर 50 टक्के क्षमतेने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु असतील.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरु असेल, मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही. आंतरजिल्हा प्रवास नियमितपणे सुरु राहील. शाळा, महाविद्यालये शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सुरु राहतील. तथापि, कोचिंग क्लासेसला रात्री नऊ वाजेपर्यंतची मर्यादा राहील. विद्यार्थी संख्या 100 पेक्षा अधिक असू नये. धार्मिक स्थळे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, याठिकाणी देखील 100 पेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीला मर्यादा कळण्यात आल्या आहेत. अम्युझमेंट व वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, कमाल मर्यादा 100 ठेवून सुरु राहतील. ग्रंथालय, अभ्यासिका रात्री नऊवाजेपर्यंत 100 कमाल मर्यादेत सुरु राहतील. परंतु त्या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारे कार्यक्रम, मेळावे, पार्टी आदीवर बंदी असेल. त्या ठिकाणी डिजे पार्टी किंवा डान्स फ्लोअर आयोजित करण्यावर बंदी असेल.  असेही आदेशात नमूद आहे.

शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्था, आरोग्य कर्मचाऱ्यांकरीता कौशल्य विकास संस्था 50 टक्के क्षमतेने 100 लोकांच्या मर्यादेत सुरु राहतील. जलतरण तलाव बंद करण्याची सूचना आहे. तसेच रॅली व यात्रा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरिकांनी या परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत सहकार्य करावे. मास्कशिवाय व गरजेशिवाय बाहेर पडू नये. प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अप्पर आदीवासी आयुक्त कार्यालयात  डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

Thu Dec 30 , 2021
नागपूर:  अप्पर आयुक्त, आदीवासी विकास कार्यालयात येथे डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास उपायुक्त डी. एस.कुळमेथे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) नयन कांबळे तसेच कार्यालयातील समस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांनी दिलेले कृषी क्षेत्रातील योगदानावर मोलाचे मार्गदर्शन केले Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com