– रॅली व सभेचे आयोजन : कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बैठक
नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रद्वारे संविधान जागर यात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी ३० ऑगस्ट २०२४ रोजी संविधान जागर यात्रेचे नागपूर शहरात आगमन होणार आहेत. यावेळी भव्य जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेच्या स्वागतासंदर्भात पूर्वतयारीच्या अनुषंगाने बुधवारी (२८ ऑगस्ट) संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेत सिंधी हिंदी महाविद्यालय, पाचपावली येथे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
बैठकीला माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, संदीप गवई, सतीश शिरस्वान, प्रो. डॉ सुधाकरराव इंगळे, रवींद्र बोखारे, शंकरराव वानखेडे, शंकरराव मेश्राम, मोहिनी रामटेके, डॉ ममतानी, इंद्रजित वासनिक, महेंद्र प्रधान, संजय कठाले, सचिन चंदनखेडे, संजय भगत, सुनील तुर्केल, किशोर बेहाडे, नेताजी गजभिये, अमिताभ मेश्राम, एड घोळेस्वार, नंदेश्वर जी, अविनाश धामगाये, सुधीर जांभूळकर आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेल्या महाडच्या भूमीतून शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी संविधान जागर यात्रेचा शुभारंभ झाला. ९ ऑगस्ट ते ८ सटेंबर २०२४ या कालावधीमध्ये संविधान जागर यात्रा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन तिथे संविधानाच्या मुलभूत हक्काबाबतचे विचार पोहोचवित आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत फिरत शुक्रवारी ३० ऑगस्टला संविधान जागर यात्रा नागपूर शहरात प्रवेश करणार आहे. उत्तर नागपूर मधील भीम चौक येथे या यात्रेचे आगमन होईल व पुढे तिचे रूपांतर आवळेबाबू चौक येथे भव्य जाहीर सभेत होणार आहे. या संविधान जागर यात्रेचे स्वागत आणि आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या यशस्वीतेसाठी मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बैठकी दरम्यान केले आहे.