आग्रा :- विरोधकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने देश तुकड्या -तुकड्यात विभागला गेला असून प्रामाणिक लोकांच्या हक्कांवर गदा आणली गेली आहे. भाजपचा मार्ग तुष्टीकरणाचा नसून सर्वांच्या कल्याणाचा आहे, तर काँग्रेसची इंडी आघाडी खोलवर तुष्टीकरणात गुंतलेली आहे. काँग्रेसने जारी केलेला जाहीरनामा विशिष्ट समाजाची मतपेढी जपण्यासाठी समर्पित असून त्यावर 100 टक्के मुस्लिम लीगचा प्रभाव दिसून येतो, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसवर नवा हल्ला चढविला.
उत्तर प्रदेशातील आग्रा, आंवला आणि शाहजहानपूर येथे आयोजित केलेल्या विशाल विजय संकल्प शंखनाद महासभांमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला सपा आणि काँग्रेसच्या वारसा कर आणि एक्स-रे योजनेची माहिती दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, केंद्रीय राज्यमंत्री आणि आग्रा लोकसभा उमेदवार एस.पी. सिंह बघेल, फतेहपूर सिक्री लोकसभा उमेदवार राजकुमार चहर, आंवला लोकसभा उमेदवार धर्मेंद्र कश्यप आणि राज्य सरकारमधील मंत्री बेबी रानी मौर्य यांच्यासहइतर पदाधिकारी याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.
भाजपचे संकल्प पत्र देश मजबूत करण्याच्या संकल्पाशी समर्पित असून पाया जितका मजबूत तितके घर मजबूत, या विचाराने भाजप गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्ती यांना “विकसित भारता”साठी सक्षम करत आहे, असे ते म्हणाले. भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण कधीच दिले जाणार नाही हे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच स्पष्ट झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छेनुसार संविधानाचा आणि सामाजिक न्यायाचा तो गाभा आहे. पण काँग्रेस हा असा पक्ष आहे, जो बाबासाहेबांचा, संविधानाचा आणि सामाजिक न्यायाचा अपमान करत आहे. काँग्रेसने कधी कर्नाटकात, कधी आंध्र प्रदेशात आणि कधी आपल्या जाहीरनाम्यात अनेक वेळा धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार केला आहे. देशाच्या संविधानाने आणि देशाच्या न्यायालयांनी काँग्रेसला हे करण्यापासून वारंवार मनाई केली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेने नेहमीच काँग्रेसची प्रत्येक गोष्ट फेटाळून लावली, त्यामुळे काँग्रेसने आता मागच्या दाराने एक खेळ खेळायला सुरुवात केली आहे, ज्यातून एससी, एसटी आणि ओबीसींच्या डोळ्य़ात धूळफेक करण्याच प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने आता धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काँग्रेसने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणातील काही हिस्सा हिसकावून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची योजना आखली आहे.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रातोरात कागदावर शिक्का मारून राज्यातील मुस्लिम समाजाला ओबीसी बनवून 27 टक्के आरक्षणात समाविष्ट केले. काँग्रेसने ओबीसी वर्गाच्या हक्कांवर डल्ला मारला आहे. तोच खेळ यूपीमध्ये खेळण्याचा काँग्रेसचा मानस असून यावेळी त्यांना समाजवादी पक्षाचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. 2012 मध्ये, उत्तर प्रदेश विधानसभेच्या आधी, काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने असाच प्रयत्न केला होता. काँग्रेसने धर्माच्या आधारावर अल्पसंख्याकांना ओबीसी आरक्षणाचा एक भाग देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर त्यांच्या हेतूत यशस्वी झाले नाहीत. काँग्रेस आणि सपाची ही घातक खेळी उत्तर प्रदेशातील जनतेला आणि ओबीसी समाजाला समजून घ्यावी लागेल. भारतीय राज्यघटनेनुसार उत्तर प्रदेशातील अनेक ओबीसी जातींना आरक्षणाचा अधिकार आहे, पण काँग्रेस आणि सपा त्यांच्याकडून हा अधिकार हिसकावून त्यांच्या आवडत्या व्होट बँकेला द्यायचा आहे. आपल्या व्होटबँकेसाठी सपा यादव आणि मागासवर्गीयांचा सर्वात मोठा विश्वासघात करत आहे. तुष्टीकरणात बुडलेल्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोघांची विचारसरणी सारखीच आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस आणि सपाच्या दोन मुलांमधील मैत्रीचा आधारही तुष्टीकरणाचे राजकारण आहे. ही दोन्ही मुलं आपल्या भाषणात ओबीसी-ओबीसी करतात, पण मागच्या दाराने ओबीसींचे हक्क हिसकावून त्यांची व्होट बँक मजबूत करण्याचे काम करतात, अशी टीका पंतप्रधानांनी केली. काँग्रेस पक्षाचे एक वैशिष्टय़ असे आहे की, जेव्हा त्यांना कोणतेही मोठे दुष्कृत्य करावे लागते, तेव्हा ते देशाच्या आणि संविधानाच्या नावाने आवाज उठवू लागतात. 70 च्या दशकात काँग्रेसने अशाच प्रकारच्या घोषणा देत देशात आणीबाणी लागू केली होती. आज पुन्हा एकदा काँग्रेसने फ्लॉप चित्रपट प्रदर्शित केला आहे, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडविली.
पूर्वी भ्रष्ट लोक तुमचा पैसा लुटायचे. पण आता काँग्रेस आणि इंडी आघाडीचा नवा प्लॅन समोर आला आहे. यात आहे काँग्रेसची लूट, जी आयुष्यासोबतही आणि आयुष्यानंतरही केली जाणार आहे. देशातील जनतेच्या मालमत्तेची चौकशी होणार असल्याचे काँग्रेसचे नेते उघडपणे सांगत आहेत. काँग्रेसच्या राजपुत्राचे एक्स-रे मशीन आता महिलांच्या कपाटात आणि लॉकरमध्ये जाऊन त्यांच्याकडून स्त्रीधन आणि मंगळसूत्रावर डल्ला मारणार आहे, या आरोपाचाही मोदी यांनी पुनरुच्चार केला. देशाच्या माता-भगिनी आपले स्त्रीधन कधीही कुणाला देणार नाहीत, हे इंडी आघाडीच्या नेत्यांना माहीत नाही. काँग्रेस-सपा यांच्या इंडी आघाडीची नजर लोकांच्या वारशावर आहे. वडिलार्जित संपत्तीपैकी निम्म्याहून अधिक मालमत्ता ताब्यात घेण्याचा कॉंग्रेसचा इरादा आहे. जनतेने गोळा केलेल्या संपत्तीवर निम्म्याहून अधिक कर लादून ती भावी पिढ्यांसाठी काँग्रेसला लुटायची आहे,असेही मोदी म्हणाले. केवळ आर्थिकच नव्हे, तर संस्थांच्या कार्यालयांचे सर्वेक्षण करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. म्हणजे एका मागास-दलित कुटुंबात दोन माणसे नोकरी करत असतील, तर एक नोकरी हिसकावून ज्यांचा देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क आहे, त्यांना ती देण्याचा डाव आहे, पण जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत देशात असा अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क आणि महिलांचे स्त्रीधन आणि मंगळसूत्र पाहण्याआधी इंडी आघाडीला मोदींशी सामना करावा लागेल. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि लुटलेला पैसा गरिबांना परत दिला जाईल, असा भाजपचा संकल्प आहे. भ्रष्टाचाऱ्यांकडून जप्त केलेला पैसा, बंगले आणि गाड्या जनतेत कशा वाटायच्या यावर मोदी वेगाने काम करत आहेत. इंडी आघाडीचे नेते माता-भगिनींच्या स्त्रीधनावर लक्ष ठेवून आहेत, पण माता-भगिनींना मालमत्तेचे हक्कदार बनवण्यासाठी मोदी चौकीदार म्हणून उभे आहेत. येत्या 5 वर्षात देशातील स्त्री शक्तीचे जीवन अधिक सशक्त होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.