– “शाश्वत, समावेशी विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” विषयावर विचारमंथन
मुंबई :- राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाची (CPA India Region) 10 वी परिषद दिनांक 23 व 24 सप्टेंबर, 2024 रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सचिव-1 (कार्यभार) जितेंद्र भोळे तसेच सचिव-2 (कार्यभार) डॉ. विलास आठवले हे उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेमध्ये “शाश्वत आणि समावेशी विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर विचारमंथन होणार आहे. चर्चासत्रात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आपले विचार मांडणार आहेत.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा ही देशातील राज्य विधानमंडळांमध्ये स्थापन झालेली (सन 1952) सर्वात पहिली शाखा आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सातत्याने राबविण्यात येतात.