नागपूर :- विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढणे आवश्यक आहे. आपण अवगत केलेल्या ज्ञानातून साकारणारे प्रयोग गावांच्या, समाजाच्या समस्या सोडविणारे ठरावेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या सभागृहात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पाय जॅम फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय फ्युचर प्रोग्रामचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, फाउंडेशनचे शोएब दर, समन्वयक संजय हरदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन आयोजित करणे प्रशंसनीय आहे. पाय जॅम फाउंडेशन व जिल्हा परिषदेने चांगल्या उद्देशातून हे आयोजन केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.’
विज्ञानाचा संबंध आयुष्याशी आहे. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर विज्ञान, तंत्रज्ञानाची जाण आवश्यक आहे. याठिकाणी ग्रामीण भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी जे प्रयोग प्रदर्शित केले आहेत, त्यातील कोणते प्रयोग आपल्या गावांमधील किंवा समाजातील समस्या सोडवू शकतात, याचा विचार करावा. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आवडीमध्ये भविष्य बदलण्याची शक्ती आहे. गावाच्या व समाजाच्या समस्या सोडविणारे, रोजगार देणारे प्रयोग काळाची गरज आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.
यावेळी ‘वेस्ट टू वेल्थ’चे उदाहरण देखील ना. गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिले. ते म्हणाले, ‘कुठलीही वस्तू टाकाऊ नसते. योग्य दृष्टी असेल तर टाकाऊ वस्तूंचाही योग्य वापर होऊ शकतो. कचऱ्यातील प्लास्टिकपासून कच्चे पेट्रोल तयार होते. ऑरगॅनिक कचऱ्यापासून सीएनजी तयार होतो. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार केल्या तर त्याला चांगली मागणी आहे. नागपूरमध्ये धोटे नावाच्या तरुणीने मेहेंदी काढण्याचे कौशल्य अनेक मुली आणि महिलांना शिकवले. आज मेहेंदी काढण्याच्या कौशल्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.’
नागपूरला शंभर एकर जागेत ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ लॉजिस्टिक आणि स्किल डेव्हलपमेंट होणार आहे. त्यादृष्टीने सामंजस्य करार देखील झाला आहे. या विद्यापीठात ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक दर्जाचे कौशल्य शिकवले जाईल, असेही ना. गडकरी म्हणाले.