– ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियानास प्रारंभ
– आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियानास प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये बालकांची संपूर्ण प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. बालकांसह त्यांच्या पालकांनीही या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. “जागरुक पालक सुदृढ बालक” या उपक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील एकूण 5327 बालकांची तपासणी करण्यात आली. तसेच हा उपक्रम 8 आठवडे सुरु राहणार आहे.
हा उपक्रम आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि अति.आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
शहरातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची संपूर्ण प्राथमिक आरोग्य तपासणी शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ विद्यालय, खासगी शाळा, अंध दिव्यांग शाळा, अंगणवाडी, खासगी बालवाडी, बालसुधारगृह व अनाथ आश्रम या ठिकाणी करण्यात आली. शहरातील खाजगी शाळांमध्ये बालकांची वजन उंची नुसार बालकाची सुदृढता मोजण्यात आली.तसेच रक्ताक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, मिर्गी इ. आजारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय विकासात्मक विलंब, ऑटिझम इत्यादी मानसिक स्वरुपाच्या आजारांवर समुपदेशन करण्यात आले.
हे अभियान पुढील ८ आठवडे शहरातील सर्व अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने एका दिवसात किमान १५० बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्टय आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेण्यात येत आहे. याशिवाय शहरातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थांची व शाळाबाह्य मुलांचीही तपासणी करण्यात येत आहे.