नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुसबिडी आणि झिग्मा कंपनीच्या कामाची पाहणी केली. सुसबिडी (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe)) कंपनी नवीन कचऱ्यावर प्रक्रिया करून आरडीएफ, बायो सीएनजी आणि सेंद्रिय खत तयार करते. तर झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशन कंपनी काही मागील वर्षापासून भांडेवाडी येथे साचलेल्या कचऱ्या वर प्रक्रिया करून त्यातून निघणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट लावत आहे. याप्रसंगी मनपा आयुक्तांसोबत अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे उपस्थित होते.
पाहणी दरम्यान बायोमायनिंग प्रकल्पाची एजन्सीद्वारे प्रक्रिया केल्यानंतरचे मटेरियल हटविण्यात न आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. प्रकल्पामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरविणे, त्यांच्या जेवणासाठी स्वतंत्र खोली तयार करणे व सर्व ट्रकला जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. एजन्सीद्वारे सुरू असलेल्या कामावर देखरेख आणि नियंत्रणासाठी ‘थर्ड पार्टी मॉनिटरींग’ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय ‘स्काडा’ आणि जीपीएस ट्रॅकिंगचे ‘ॲक्सेस’ मनपाकडे तात्काळ घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
सुसबिडी द्वारे राबविण्यात येणा-या प्रकल्पाच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच त्यांनी कंपनीतर्फे लावण्यात आलेल्या मिनी प्लांटची सुद्धा पाहणी केली. येथे कचऱ्यापासून आरडीएफ आणि बायो सीएनजी तसेच सेंद्रिय खत तयार केले जात आहे. आयुक्तांनी सुसबीडीच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नवीन प्लांटची स्थापना करण्याचे निर्देशित केले. याप्रसंगी नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले, उप अभियंता श्री प्रशांत वाघमारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.