– उज्ज्वल नगर उद्यानात होणार ७०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उज्ज्वल नगर उद्यान येथे वृक्षारोपण करून मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणाची सुरुवात केली. नागपूर महानगरपालिका, यंग इंडियन्स नागपूर चॅप्टर आणि सीआयआय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उज्ज्वल नगर येथे ४२०० वर्ग फूट जागेमध्ये विविध प्रजातीच्या ७०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
मियावाकी वृक्षलागवड पद्धतीमुळे कमी जागेत जास्त वृक्षांची लागवड करता येते. उज्ज्वल नगर उद्यानात गुलमोहर, नीम, बांबू, मोहमनी आणि रेन ट्री यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मुक्ता असोशिएट्सचे महेश गभणे यांनी उद्यानातील मातीची माहिती घेऊन वृक्षांची लागवड केली आहे.
एसएमएस कंपनीच्या सौजन्यातून वृक्ष लावण्यात आले असून नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून नेमलेले कंत्राटदार स्वप्नील आष्टीकर उद्यानाची देखरेख करणार आहेत. याप्रसंगी उपस्थित परिसरातील नागरिक वसंत खडसे यांनी महापालिका आयुक्तांना सुरक्षा भिंत बांधण्याचा आग्रह केला आणि उद्यानाबद्दल माहिती दिली.
यावेळी मनपाचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, अभियंता संजय गुजर, यंग इंडियन्स चे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष अंकुर चिमा, स्नेहा मोखा, अदिती सिर्सिकर, अंकिता सारडा, श्रेया संचेती, आयुष गांधी आणि इतर उपस्थित होते.