पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी व दुबार पेरणी टाळावी – गोविंद वैराळे राज्य समन्वयक
नागपूर :- भारत सरकारच्या कृषी मंत्रालय अंतर्गत देशामध्ये कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कापूस अति घन लागवड पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प मध्ये महाराष्ट्रात वर्ष २०२३ २४ राबविण्यात येत आहे सदरचा प्रकल्प राबविण्याकरिता देशामध्ये ICAR-CICR यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखालील राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये वर्धा व नागपूर या दोन जिल्हयामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्रीज कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन, मुंबई द्वारे १००० एकर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कापूस अति घन लागवड पद्धतीच्या सूचना प्रमाणे दोन ओळी तील अंतर ९० सेंमी(३ फुट) आणि दोन झाडातील अंतर १५ सेंमी (६ इंच) ठेवणार आहे व त्यानुसार एका हेक्टर मध्ये ७४००० कापूस झाडांची संख्या होईल कापूस अति घन लागवड पद्धतीमध्ये प्रती हेक्टरी १५ बियाणांचे पॉकेट (६ पॉकेट प्रती एकरी) लागणार आहेत त्यामुळे कापूस झाडांची संख्या वाढणार आहे. कापसाच्या उत्पादनामध्ये सुमारे ३० टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल. नागपूर विभागात ५०० एकरमध्ये कापूस अति घन लागवड पद्धतीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कापूस बियाणे वाटपाचा शुभारंभ दिनांक ६ जून २०२३ रोजी मोहगाव तालुका हिंगणा येथे झाला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद डाखरे सरपंच मोहगाव, दीपा कुंभार तालुका कृषी अधिकारी हिंगणा, प्रमुख उपस्थिती डॉ. मनिकंडन वरिष्ठ शात्रज्ञ सी आय सी आर नागपूर, गोविंद वैराळे राज्य समन्वयक, आशिष बिसेन सी टी सी डी आर ए, जगदीश नेरलवार कृषी अधिकारी, वर्षा काळे कृषी विभाग उपस्थित होते. याप्रसंगी हिंगणा तालुक्यातील या प्रकल्पातील शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना कापूस अति घन लागवड पद्धतीबाबत कापसाचे उत्पादन वाढीसाठी बियाणांची बीज प्रक्रिया पेरणी व लागवडीची पद्धत या बाबत उपस्थितीतांनी शेतकऱ्यांना मागदर्शन केले. या वर्षी मान्सून पावसाचा अंदाजात संभ्रम असल्यामुळे पेरणीसाठी आवश्यक पाऊस झाल्या नंतरच कापसाच्या बियाणांची पेरणी करावी व दुबार पेरणी टाळण्यात यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावना व आभार प्रदर्शन आशिष बिसेन यांनी केले.