मुंबई :- केंद्रातील एनडीए सरकारच्या विकसित भारताची पायाभरणी करणा-या अर्थसंकल्पाचे देशाच्या कानाकोप-यातून कौतुक होत असताना अर्थसंकल्पाबाबत काहीही माहिती नसणारा एक ढ विद्यार्थी संजय राऊत सारख्याने अर्थसंकल्पाबाबत ज्ञान पाजळावे हे हास्यास्पद आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी केली . भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन हे यावेळी उपस्थित होते. अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण विवेचनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेताना आ. राणे यांनी उद्धव ठाकरे, राऊत यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अर्थसंकल्पावरील चर्चेला येण्याचे खुले आव्हान दिले.
आ.राणे म्हणाले की राऊत यांचा मालक उद्धव ठाकरे यांनी स्वत:च जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याला अर्थसंकल्पातील काही कळत नाही याची कबुली दिली होती. असे मालक अर्थसंकल्पावर टीका करतात आणि याच मालकाचा कामगार असलेले राऊत हेही अर्थसंकल्पावर बोलून आपले ज्ञान पाजळत आहेत.या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुल्या चर्चेचे मी दिलेले आव्हान हिंमत असेल स्विकारावे असेही आ. राणे यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पातील बारकावे याची उत्तम जाण फडणवीस यांना असून त्यांनी अभ्यासपूर्वक ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ ही पुस्तिका लिहीली होती. ही पुस्तिका राऊत यांना पाठवतो त्यांनी याचा अभ्यास करावा म्हणजे त्यांना फडणवीस यांची कुवत,समज आणि ताकद कळेल अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली.