Ø सी-व्हिजील ॲपवरील तक्रारींवर वेळेत कारवाई
Ø मद्यविक्री अचानक वाढल्यास विक्रीची चौकशी
यवतमाळ :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीदरम्यान करावयाची कामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, उपजिल्हाधिकारी श्री.गायकवाड, अभिमन्यू बोदवड, संतोष वेणीकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपप्रादेशिक अधिकारी डी.ई.हिरडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी नाईक यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ व त्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सदर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून जबाबदारीने कामे पुर्ण होतील यासाठी दक्ष राहून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सैन्य दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच निवडणूक कर्तव्यात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध आहे, त्याचा देखील आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात काही ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यात आदर्श मतदान केंद्र, महिलांद्वारा संचालित केंद्र, युवकांद्वारा संचालित केंद्र व दिव्यांगांद्वारे संचालित केंद्रांचा समावेश आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व त्यांना प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्था, मतदान केंद्रातील कर्मचारी, तेथील मतदान यंत्रांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक नियोजनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
आचारसंहिता लागल्यानंतर शस्त्र जमा करावे लागतात. त्याचा देखील पोलिस विभागाकडून त्यांनी आढावा घेतला. आयोगाने निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या तक्रारींसाठी नागरिकांना तक्रार नोंदविता यावी म्हणून सी-व्हिजील ॲप सुरु करण्यात आले आहे. या ॲपवर येणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मद्य विक्री अचानक वाढल्यास होणार चौकशी
निवडणुकीरम्यान मद्य विक्रीवर प्रशासनाची बारकाईने नजर राहणार आहे. विक्री दुकानांमधून अचानक विक्री वाढल्याचे आढळल्यास अशा दुकानांची विशेष चौकशी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मद्य विक्रीत फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 30 टक्के पेक्षा अधिक विक्री निदर्शनास आल्यास सदर चौकशी केली जाणार आहे.