नागपूर, दि.25 : आज पर्यटन संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला. या दिनाचे यावर्षीचे घोषवाक्य “ग्रामीण आणि समुदाय पर्यटन” असे असल्याने त्यानुरूप, रामटेक तालुक्यातील काही वारसा स्थळे व कृषी पर्यटन स्थळांचा कॅरॅव्हॅन या विशिष्ट वाहनातून दौरा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आर विमला यांच्या प्रमुख उपस्थितीत या कॅरॅव्हॅन हेरिटेज टूर चा प्रारंभ झाला. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच कॅरॅव्हॅन पर्यटनास उत्तेजन देणारे निर्णय जाहीर केलेले आहेत. पर्यटन संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई म्हणाले कि विदर्भात कॅरॅव्हॅन, कॅम्पिंग आणि कृषी पर्यटनाला प्रचंड वाव आहे. व्हेकेशन ऑन व्हील्स च्या संचालिका नेहा सोमण सांगतात की मुंबई व पुण्यात लोकप्रिय असलेलं कॅरॅव्हॅन आणि कॅम्पिंग टुरिझम लवकरच देशभर प्रसिद्ध होईल. कॅरॅव्हॅन क्षेत्रात मोठं नाव असलेली त्यांची कंपनी नागपूर येथे सुद्धा सेवा देते आहे. जिल्हाधिकारी आर विमला यांनी स्वतः कॅरॅव्हॅनचा आनंद घेतला व या अभिनव संकल्पनेस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कृषी आधारित पर्यटन हा ग्रामीण पर्यटनाचा आधार आहे. प्रशांत सवाई यांनी माहिती दिली की कृषी पर्यटन केंद्र या संकल्पनेस प्रगतिशील शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या एक वर्षात सुमारे ४० कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी झाली आहे. त्या पैकी काही केंद्रांना भरीव यश प्राप्त झाले. रामटेकच्या खिंडसी तलावाला लागून असलेले चेरी फार्म, गोंडखैरीचे महाजन वावर, अडेगाव ची ठाकूर वाडी हि कृषी पर्यटन केंद्रे विदर्भाच्या कृषी पर्यटनाच्या यशस्वितेची साक्ष देतात. ऍग्रोटुरिझम व एडवेंचर पर्यटनाची सुरेख जोड साध्य केलेले चेरी फार्म चे संचालक अमोल खंते सांगतात कि, त्यांच्या फार्मवर येणारा पर्यटक प्रत्येकदा निराळे अनुभव घेऊन जात असतो कारण निसर्ग दररोज नवा असतो. शेतशिवारात मिळणार निर्भेळ आनंद, रात्री तलावाकाठी शेकोटीभोवती बसून ताऱ्यांना न्याहाळणे, नौकानयनाचा आनंद घेऊन आलेली सकाळ, हिवाळ्याच्या कोवळ्या उन्हात आमराईत घालवलेली निवांत दुपार, टेकड्यांमधून फिरताना पक्ष्यांचा गुंजारव हे केवळ शब्दातीत अनुभव आहेत. यातून मिळणारा तरल आनंद जगावा हि ओढ लोकांना पुन्हा पुन्हा फार्मवर घेऊन येते. शालेय विद्यार्थी असोत वा युवा पिढी, कौटुंबिक सहल असो वा ज्येष्ठ नागरिक ; पर्यटनाचा हा पर्याय सर्वांना भुरळ घालतो आहे.
वारसा स्थळांच्या सफरीत विदर्भाच्या इतिहासाचे युवा अभ्यासक अथर्व शिवणकर यांनी कापूरबावडी, सिंदुरबावडी, त्रिविक्रम मंदिर या वारसा स्थळांची सुरेख माहिती दिली. रामटेक गडमंदिराच्या पायथ्याशी असलेले कापूरबावडी हे १२०० वर्षे जुने यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे. कर्पुर म्हणजे कापूर आणि बावडी म्हणजे विहीर. कापुराच्या गुणांनी युक्त पाणी असलेली विहीर असा कापुरबावडीचा महिमा रामटेकचे जुने – जाणते लोकं सांगतात. अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असलेली कापूरबावडी बघायला देशभरातून इतिहास व पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक येतात. रामटेक गडावरील लक्ष्मण मंदिराच्या शिलालेखात ” सिंदुर्वापी उत्तरे कर्पूरवापी ” असा गड परिसरातील सिंदुरबावडी व कापूरबावडी या दोन्ही बावडींचा उल्लेख आहे. चुनखडीच्या अजिबात वापर न करता बांधण्यात आलेली कापुरबावडी अजूनही प्राचीन काळाच्या वैभवाची साक्ष देत उभी आहे. सप्तमातृका म्हणजे सात देवींच्या मूर्ती येथे स्थापित असल्यामुळे कापूरबावडीला शाक्त परंपरेशी जोडण्यात येते. कापूरबावडीच्या मंदिराची तिन्ही शिखरे अभ्यासकांच्या उत्सुकतेचा विषय आहेत. भूमिजा पद्धतीची शिखरे आणि झेंड्याखाली ठळक आम्लके असणारे हे बांधकाम पुढे अनेक भोसलेकालीन वास्तूसाठी प्रेरणा ठरले असे नागपूर च्या अनेक जुन्या वस्तूंना पाहून नक्कीच म्हणता येईल. शिखराच्या कळसात झेंड्याखाली असलेली गूढ पोकळी व खोली त्याकाळी नेमकी कश्यासाठी बांधण्यात यायची याबाबत तज्ञामध्ये विविध मत आहेत. रामटेकच्या सुद्धा अनेक लोकांना माहीत नसलेली बाब म्हणजे गड मंदिराला जाणारा जुना रस्ता कापूरबावडी पासूनच जातो. आमराई व बाबूच्या बनात असलेली कापूरबावडी कधीकाळी रामगिरीच्या पांथस्थांसाठी जलस्त्रोत होता. १२ व्या शतकात बांधण्यात आलेली ही बावडी काही प्रमाणात पडझड झालेली असली तरीही अजुन शाबूत आहे. लक्ष्मण मंदिराच्या शिलालेखात असाही उल्लेख आढळतो की विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध आज जेथे रामटेकचे गडमंदिर आहे त्याच ठिकाणी केला. हिरण्यकश्यपूच्या रक्ताने हा गड लाल झाला म्हणून गडावरच्या बावडीला सिंदुरबावडी असे नाव पडले ही आख्यायिका आहे. खिंडसी तलावाचे प्राचीन नाव सुदर्शन तडाग आहे हे सुध्दा फार कमी लोकांना माहिती असेल. सिंदुरबावडी पासूनच अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं त्रिविक्रम मंदिर हे रामटेक परिसराचे अवलोकन करण्याचे सर्वोत्तम ठिकाण होय. अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या माचीवर उभे राहून रामटेक गडमंदिर , खींडसी तलाव, रामटेक शहर व अर्वाचीन जैन मंदिर हे सर्व एकाच ठिकाणाहून पाहता येतं. दूरपर्यंत पसरलेली हिरवीकंच शेतशिवारे, खींडसी तलावाचे निळेशार पाणी आणि आसमंतात निसर्गाने केलेली रंगांची उधळण असे विहंगम वर्णनातीत दृश्य या माचीवरून नजरेत साठवता येईल.
फार्म्स व वारसा स्थळांच्या टूर नंतर सायंकाळी ज्ञानवर्धक वेबिनार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आर्किटेक्चरल संकुल नागपूर यांच्याद्वारे ”तुमचे नागपूर ओळखा – एक पर्यटक दृष्टीकोन” या वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी आर विमला व पर्यटन संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर विदर्भ इकॉनॉमी डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद कौन्सिल) चा ”कृषी पर्यटन” या विषयावर वेबिनार झाला. महाराष्ट्र हे कृषी पर्यटनाला धोरणात्मक मान्यता देणारे पहिले राज्य आहे, हि माहिती प्रशांत सवाई यांनी दिली. कृषी पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलती सवाई यांनी सांगितल्या. सबंध दिवसभर चाललेल्या या आयोजनात ऍग्रोव्हिजनचे समिती सदस्य पंकज महाजन व ठाकूर वाडी ऍग्रीकल्चर अँड इको टुरिझम चे संचालक विवेक सूर्यवंशी सहभागी होते.
कॅरॅव्हॅन – चाकांवरती घर !
कॅरॅव्हॅन हा वाहनप्रकार विशेषतः कॅम्पिंग व एडवेंचर पर्यटनाच्या दर्दी मंडळींत प्रचलित आहे. हे वाहन म्हणजे एक चालते फिरते घरच ! हे वाहन हॉटेलहुन कमी नाही. ४ ते ६ लोकांच्या झोपण्याची सोय, किचन, टॉयलेट, बाथरूम, टीव्ही, ए सी, जनरेटर अश्या सर्व सोईंनी सज्ज असलेले हे वाहन अगदी अलीकडेपर्यंत भारतात उपलब्धच नव्हते. पर्यटन संचालनालय व व्हेकेशन ऑन व्हील्स यांच्या प्रयत्नांनी आता याचा आनंद नागपूरच्या लोकांनाही घेता येईल. व्हेकेशन ऑन व्हील्स च्या संचालिका नेहा सोमण म्हणाल्या कि महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक अनुकूलतेमुळे अत्यंत वाजवी दरात त्या कॅरॅव्हॅनची संकल्पना प्रत्यक्षात आणू शकल्या. कॅरॅव्हॅनसाठी एमटीडीसी च्या सिविल लाईन्स स्थित कार्यालयास संपर्क करावा अथवा व्हेकेशन ऑन व्हील्स ला ऑनलाईन संपर्क करावा.