– शासकीय कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
तर हॉटेल्स मध्ये सिद्धार्थ प्रिमियम अव्वल
चंद्रपूर :- स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत शहरातील विविध श्रेणीतील कार्यालये प्रतिष्ठाने यांची स्वच्छतेविषयक तपासणी पूर्ण करण्यात आली असुन त्यांची श्रेणीनिहाय क्रमवारी मनपाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या मापदंडावर उत्कृष्ट ठरलेल्या प्रतिष्ठानांचा २३ मे रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत चंद्रपूर शहरातील विविध श्रेणीतील शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, बाजार समिती,हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली व निकषानुसार गुणानुक्रमांक देण्यात आले. यात अव्वल ठरलेल्या प्रतिष्ठानांमध्ये शासकीय कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड कार्यालय, रुग्णालये विभागात मानवटकर हॉस्पीटल, शाळांमध्ये चांदा पब्लीक स्कुल, बाजार संघटनेमध्ये गंजवार्ड बाजार, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला या विभागात शास्त्रीनगर परीसर व हॉटेल्स विभागात सिद्धार्थ प्रिमिअर अव्वल ठरले आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार प्रसार होऊन यात नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छता तपासणी दरवर्षी करण्यात येते. स्वच्छतेसाठी शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार जानेवारी महिन्यात मनपा हद्दीतील विविध शासकीय कार्यालये, संस्था, रुग्णालये, शाळा ,बाजार संघटना, हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी महानगरपालिकेच्या चमूद्वारे करण्यात आली.
आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल – मनपाच्या स्वच्छता पाहणी मोहीमेस शहरातील सर्व आस्थापना सहकार्य करत असुन सहकार्य करतांना ते आपला परीसर तर स्वच्छ ठेवतातच पण येणारे नागरीक,त्यांचे ग्राहक,शाळेतील विद्यार्थी यांना एकप्रकारे स्वच्छतेची जाणीव करून देत आहे आणि हेच तर या स्वच्छता मोहीमेचे उद्दिष्ट आहे.मी जीवनात काय करतो ही जाणीव जेव्हा एखाद्याला होते तेंव्हा तो आपोआप प्रगती करतो तसेच मी स्वच्छतेसाठी काय करतो ही जाणीव निर्माण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.