यवतमाळ :- उमरसरा परिसरातील छत्रपती सोसायटीमधील मैदानामध्ये ब-याच दिवसांपासून सारस नामक प्राणी होता. या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात गांजर गवतासह झाडेझुडपेही वाढलेले होते. त्यामध्ये तो प्राणी दडला असल्याने याबाबत नगर परिषदेच्यावतीने दखल घेऊन जेसीबीच्या सहाय्याने मैदानाची स्वच्छता करण्यात आली.
छत्रपती सोसायटीमधील गणपती विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर असलेल्या खुल्या मैदानाला नुकतेच नगर परिषदेच्यावतीने तार कंपाऊंड टाकण्यात आले. तसेच या ठिकाणी उद्यान करण्याचीही योजना आखण्यात आली आहे. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात गांजर गवत व झाडे झुडपे वाढली होती. यामध्ये काही दिवसांपूर्वी सारस नामक प्राणी दडलेला असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. याबाबत माजी नगरसेविका दर्शना इंगोले यांना अवगत केल्यानंतर त्यांनी लगेच जेसीबीची व्यवस्था करुन संपूर्ण मैदानाची स्वच्छता करून दिली. यावेळी नगर परिषदेचे प्रभाग २२ वॉर्ड शिपाई कुलदिप ब्राह्मणे जातीने लक्ष देऊन होते. स्वच्छता झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.