नागपूर, ता. ७ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणावर विशेष भर देण्यात येत आहे. पर्यावरणाचाच एक भाग म्हणून शहरातील भोसलेकालीन जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. जलस्रोतांच्या संवर्धनासोबतच स्थानिक नागरिकांना निःशुल्क शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने शहरातील जुन्या भोसलेकालीन सर्व विहिरींची स्वच्छता करून त्यावर आरओ प्लांट उभारण्यात येणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. रविवारी (ता. ६) आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांच्या प्रभाग क्रमांक २१ मधील लालगंज येथील ४२५ वर्ष जुन्या चोरपावली विहिरीवर उभारण्यात येत असलेल्या आरओ प्लांटचे महापौरांनी भूमिपूजन केले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, सुरेंद्र डोळस, प्रशांत सोनारघरे, निशा भोयर, सुरेख पौनीकर, सुरेश पौनीकर, गणेश पौनीकर, गुड्डू पांडे, हर्षल वाडेकर, किशोर ठाकरे, उषा बेले आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, शहरातील जुने जलस्रोत जगले पाहिजे. या जलस्रोतांमुळे नवीन पिढीला जुनी व्यवस्था समजून घेता येईल. या जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रविवारी चोर पावली विहिरींची सफाई करण्यात आली. तसेच विहिरीचे पाणी वापरात यावे आणि नागरिकांना सुद्धा याचा फायदा व्हावा या दृष्टीने या ठिकाणी आरओ प्लांट बसविण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांना निःशुल्क शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी ५ रुपयात २० लिटर पिण्याचे पाणी मिळेल अशी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. नागरिकांना कमी दरात पाणी मिळेल आणि यातून आरओ प्लांटची देखभाल करण्यासही मदत होईल, असे महापौर यावेळी म्हणाले.
आज बाहेर एक लिटर पाणी २० रुपयाला विकत घ्यावे लागते. मात्र मनपातर्फे ५ रुपयात २० लिटर पाणी देण्यात येणार आहे. येत्या काळात शहरातील सर्व भोसलेकालीन ऐतिहासिक विहिरीवर अशा प्रकारचे आरओ प्लांट उभारण्यात येणार असल्याचे, महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले. हा प्रकल्प प्रभाग २१ चे नगरसेवक महेश (संजय) महाजन यांनी यांच्या प्रयत्नाने साकार होत आहे. यासाठी महापौरांनी महेश (संजय) महाजन यांचे अभिनंद केले.
प्रभाग क्र. २१ चे नगरसेवक यांच्या १२ लाख रुपयाच्या निधीतून या विहिरीची सफाई करण्यात आली. या विहिरीवर बसविण्यात आलेले आरओ प्लांट एका तासाला एक हजार लिटर पाणी शुद्ध करणार आहे.