संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दस्तनोंदणी करताना शेतकऱ्यांचा होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने सलोखा योजना सुरू करण्यात आली आहे त्यानुसार एप्रिल महिन्यापासून कामठी तालुक्यात या सलोखा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे तेव्हा कामठी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सलोखा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
शेत जमिनीच्या ताब्यावरून आणि वहिवाटीवरून शेतकऱ्यांचा आपसी वाद मिटवून समाजात सलोखा निर्माण होऊन एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आणी दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी नाममात्र मुद्रांक शुल्क आणि नाममात्र नोंदणी फी आकारनारी सलोखा योजना कामठी तालुक्यात राबविण्यात येत आहे.या सलोखा योजनेमुळे गट अदलाबदलीचा मार्ग सुकर झाला आहे.एका आठवड्याच्या आत या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होते.त्यासोबतच त्या गटाची मालकीसुद्धा मिळते.शेत जमीनधारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी फी नाममात्र एक हजार युपये आकारण्यात येते.कमी पैशात या योजनेतून गटाची अदलाबदलीचे कामे होण्यास मदत होते तर या योजनेतून गट अदलाबदलीच्या प्रकरणांना न्याय देता येतो.तेव्हा कामठी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सलोखा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.