मुंबई :- शाश्वत कृषी आणि सामूहिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्य करित असून, नागरिकांनीही यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन आणि हरित गुंतवणूक या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. ‘कम्युनिटी बेस्ड टुरिझम – सगुणा बाग एक अनुभव’ यावर या परिसंवादात चर्चा करण्यात आली. सगुणाबागची सुरुवात आणि कृषी पर्यटनाकडे वाटचाल याबाबत सगुणाबागचे चंदन भडसावळे यांनी माहिती दिली.
महाव्यवस्थापक जयस्वाल म्हणाले की, राज्यात चार हजार कृषी पर्यटन केंद्र असून, एमटीडीसी पर्यटन विकासासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करित आहे. शेतकरी शेती करीत असतानाच शून्य गुंतवणुकीद्वारे कृषी पर्यटन करू शकतात. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नागरिकांनी कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार देणाऱ्या सगुणाबागचे संचालक चंदन भडसावळे यांनी कृषी पर्यटनाबद्दल यावेळी माहिती दिली.