– स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे 2,53,162 नागरिकांचा सहभाग
मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक शेखर रौंदळ, अवर सचिव चंद्रकांत मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 24,340 गावे म्हणजेच 60% पेक्षाअधिक गावे हागणदारी मुक्त (ODF Plus ) जाहीर झाली आहेत. ही बाब महाराष्ट्र राज्यातील नागरीकांसाठी निश्चितच दिलासादायक आहे, या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी उत्तम नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 10,188 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 43,85,441 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या स्वच्छता संवाद कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच यांनी त्याचा जिल्हा, तालुका, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेल्या उपाय योजनाबाबत आपले अनुभव सांगितले. त्यांनी केलेल्या उपाय योजना राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. या कार्यक्रमात प्रशासनाबरोबर नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत आहे. ही बाब महाराष्ट्र शासनासाठी उत्साहवर्धक आहे. आपण सर्व जण एकत्र येवून राज्याला स्वच्छ राज्य म्हणून मार्च 2024 पर्यंत घोषित करण्याबाबत प्रयत्न करुया, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.
स्वच्छता संवाद या दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमाला राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ सुमारे 2,53,162 यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, यांच्याशी थेट संवाद साधला.