रुपेश वाळके, प्रतिनिधी
– शेतीकामावर विपरित परिणाम ; नियोजन कोलमडले !
दापोरी :– मोर्शी तालुक्यात मागील १५ दिवसांपासून उन-पावसाचे वातावरण पाहायला मिळत असून मोर्शी तालुक्याला वादळी अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले असतांना आता पुन्हा उन्हाळ्याच्या झळा वाढत असल्याने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.
मोर्शी तालुक्यात मागील आठ दिवसा पासून सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेचा कहर असाच सुरू राहिला तर पुढचा मे महिना शेतकरी बांधवांसाठी अग्नीपरीक्षेचा ठरणार असून उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शेतीकामाचे पूर्ण नियोजन कोलमडले असल्याने मोर्शी तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
दरम्यान हवामान विभागाने सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट पुढे सुद्धा राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्यांची आणखी चिंता वाढली आहे. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षांनंतर मे महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तपमानाचा पारा ४४ अंशाच्या पुढे जात आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रखर उन्हाला सुरुवात होते. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.
मोर्शी तालुक्यात सकाळी १० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कडक उन्हाळ्यापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी थंडपेयाचा आसरा घेतला आहे. तिव्र उष्णतेमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला असून घरात थांबणे देखील मुश्कील झाले आहे. उकाड्यामुळे शरिरातून घामाच्या धारा वाहताहेत. प्रचंड उष्णतेमुळे एसी व पंखे देखील निकामी झाल्यासारखे वाटत आहेेत. उष्ण तापमानामुळे विजेवर चालणारी उपकरणे देखील कूचकामी ठरल्याने अंगाची लाही-लाही होत आहे.
एकीकडे नागरिकांची अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र, शेतीच्या कामावर तिव्र उष्णतेचा विपरित परिणाम झाला आहे. उन्हाच्या तिव्र कडाक्याने शेतातील पिके लवकर पाण्यावर येऊ लागली आहेत. त्यातच महावितरणने आठवड्यातील चार दिवस दिवसा व चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा सुरू ठेवल्याने रात्री एक नंतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी बांधवांना शेतात जावे लागते व रात्रभर पिकाला पाणी द्यावे लागते. पाणी ओलितामुळे झोप मिळत नाही तर दिवसा प्रचंड उकाड्यामुळे झोप होत नाही. याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
सध्या अनेक ठिकाणी शेतकर्यांची शेतीची कामे, संत्रा झाडांचे ओलित, यासह मशागतीची विविध कामे सुरू झाली आहे. सध्या शेतात कामांचा हंगाम सुरू आहे. परंतु प्रचंड उष्णतेचा त्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. प्रचंड उष्णतेमुळे काम करण्यास मजूर पुढे येत नसल्यामुळे शेतातील कामे तशीच पडून आहे. जमिनीला प्रचंड उष्णतेमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगातून रात्री साप, विंचू, नाग व वन्य प्राणी बाहेर पडतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टीवर बळीराजा जिवावर उदार होऊन मात करण्यासाठी धडपड करत आहे.
मोर्शी तालुका ड्राय झोनमध्ये असल्यामुळे मोर्शी तालुक्यात काही अंशी पाण्याचा प्रश्न जाणवत असला तरी विजेचा प्रश्न सतावणाराच आहे. उष्णतेच्या लाटेमुळे संत्रापिक, चारापिके करपू लागली आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुधाळ जनावरांच्या दुधावर देखील परिणाम झाला आहे. जनावरांची दूध देण्याची क्षमता यामुळे कमी झाली आहे. एकंदरित उष्णतेच्या लाटेचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांनाच !
पाऊस नाही पडला तरी शेतकरी अडचणीत, पाऊस कमी पडला तरी शेतकरी अडचणीत, अती पाऊस झाला तरी शेतकरी अडचणीत, जास्त थंडी पडली तरी पिके धोक्यात, आभाळ आलं, ढगाळ वातावरण झाले तरी रोगराई चे संकट पिकांवर, प्रचंड उष्णतेच्या झळा देखील शेतकर्यांनाच बसतात. उन्हातान्हात रात्रंदिवस मुलाबाळांसह शेतात राबराब राबून एका दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराजा मात्र या सर्वा पासून उपेक्षितच राहिला. त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच अजिबात वेळ नाही. यापेक्षा आणखी काय उपेक्षा बळिराजाची होऊ शकते? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.