जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व पोलीस स्टेशन चामोर्शी यांची कार्यवाही
गडचिरोली : दिनाक 10 मार्च रोजी शुक्रवारला चामोर्शी शहरात एक बालविवाह होणार आहे अशी माहिती पोलिस स्टेशन चामोर्शी यांना मिळाली. त्यांनतर पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी सदर माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांना दिली. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम व पोलीस पथक यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाह स्थळ भेट दिली. मुलाची व मुलीचं जन्म पुरावा तपासणी करून , बालीका 18 वर्षाखालील आणि मुलगा 21 वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व मुलाचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.
मुलीकडचे व मुलाकडचे हे दोन्ही मंडळी हे नागभिड तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते चामोर्शी शहरात फेब्रुवारी महिन्यात रोजगाराच्या शोधात कामाकरिता (भटकंती जमात) आले होते. तसेच एक दिवसा आधी त्यांनी हळदीचा कार्यक्रम पण पार पाडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वधू व वरांकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत बालविवाह चामोर्शी येथे होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी सदर बालिकेच्या तात्पुरता स्वरूपात राहणाऱ्या ठिकाणी त्याचे घर गाठून मुलीच्या आई वडिलांकडून मुलीचे 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे व मुलाचे समुपदेशन करण्यात आले.
तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांचे उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्या नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, पोलीस स्टेशन चामोर्शीच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस जीवन हेडावू, सामाजीक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार यांनी कार्यवाही केली.
अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर,1098 वर बाल विवाह बाबत संपर्क करावे असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.