लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण

मुंबई :- लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित करणारे विशेष टपाल पाकीटाचे अनावरण बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूत करणे हे अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आणि एकता दिनानिमित्त भारतीय टपाल विभाग आणि बिर्ला समूहाच्यावतीने विशेष टपाल पाकिटाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिरला हाऊस येथे आज झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा गांधी आणि लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल या महान व्यक्तींचे वास्तव्य बिर्ला हाऊस मध्ये होते. या ऐतिहासिक वास्तूत लोहपुरूष सरदार पटेल यांच्या कार्यास समर्पित करणारे टपाल पाकिटाचे अनावरण करणे ही अभिमानास्पद बाब आहे.

अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या लोहपुरूषाच्या कार्याला स्मरण करून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व वर्गातील लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जनतेच्या सहकार्याने शासन कार्य करीत असून, जनतेला भविष्यात विकासात्मक बदल दिसेल.

पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या की, राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यास समर्पित विशेष पाकीटाच्या दोन हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांचे टपाल तिकीट भारतीय टपाल विभागाने प्रसिद्ध केले आहे.

या कार्यक्रमास खासदार श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, भारतीय टपाल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, सहायक निदेशक स्मिता राणे, यश बिर्ला समूहाचे अध्यक्ष यशवर्धन बिर्ला, पत्नी अवंती बिर्ला यांच्यासह बिर्ला कुटुंबिय, भारतीय डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

Tue Nov 1 , 2022
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन  मुंबई :- दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ देण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठा प्रतिज्ञा दिली तसेच राज्यपाल कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले. पुढील २५ वर्षे अमृतकाळ म्हणून देशासाठी महत्वाचे असल्याचे माननीय पंतप्रधानांनी जाहीर केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com