भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील सोयी-सुविधांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

– सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश

– देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

– महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी

मुंबई :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराज, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, भदंत डॉ.राहुल बोधी, संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, अशा सुचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

माजी उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, दरवर्षी चांगली सुविधा देण्यात येते. यावर्षीही कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्याव्यात. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमलात आणाव्यात. संवेदनशीलता ठेवून चांगल्या प्रकारे नियोजन करावे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रारंभी चैत्यभूमी परिसरात आजपर्यंत झालेल्या सोयी सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. ज्येष्ठ व्यक्तींना रांगेत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असावी, यासाठी परिसरातील गुरूद्वारांना आवाहन करावे, त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकावरून चैत्यभूमीपर्यंत बसची शटल सेवा सुरू ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. यासह दिशादर्शक फलक, रात्री पुरेशा लाईटची सुविधा, रेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवालेमुक्त करणे, जीवरक्षक बोटींची व्यवस्था, पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था, वैद्यकीय पथके, समन्वय कक्ष आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त गगराणी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, आदींनी त्यांच्या यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. भदंत डॉ.बोधी, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींनी शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

Wed Dec 4 , 2024
मुंबई :- भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (“Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघल, टाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!