– ब्रिटनवरून परतल्यानंतर चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत
– नागपूरपासून जाम, वरोरा, भद्रावती, पडोली या ठिकाणी नागरिकांचा जल्लोष
चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय कार्य आहे, अशी भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. महाराजांच्या वाघनखांना भारतात आणण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत करार झाल्यानंतर ना.मुनगंटीवार प्रथमच चंद्रपुरात दाखल झाले. त्यानिमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदनाचा सोहळा आयोजित करण्यात आला.
ना. सुधीर मुनगंटीवार नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यापासून तर चंद्रपूरला येईपर्यंत नागपूर, जाम, वरोरा, भद्रावती, पडोली आदी ठिकाणी नागरिकांनी जल्लोष केला. अनेकांनी ना. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर चंद्रपुरात भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी हरीश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,राहुल पावडे भाजपा महानगर अध्यक्ष ,चंदन सिंग चंदेल माजी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष,देवराव भोंगळे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष,अतुल देशकर माजी आमदार , माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर,विजय राऊत, नामदेव डाहुले,रामपाल सिंग, संध्या गुरनुले,अल्का आत्राम, रेणुका दुधे,विवेक बोढे,आशिष देवतळे,रमेश राजुरकर, अंजली घोटेकर,सुभाष कासनगोटूवार,ब्रिजभुषण पाझारे आणि अनेक सामाजिक संस्थांनचे पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी, जी. प .मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी मुरुगनंथम यांनी स्वागत केले.
कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेले स्वागत आपल्या निरंतर स्मरणात राहणार आहे, अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मनातील स्नेहभाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेला आदर दर्शवित होता. चंद्रपूर जिल्हा भाजपातर्फे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सत्कार व स्वागतासाठी आभार मानले. ‘तुमच्यासारखे कार्यकर्ते, उत्साहाने शुभेच्छा देणारे शिवभक्त माझ्या जिल्ह्यात आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. हा उत्साह मी बघू शकतो यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो,’ या शब्दांत त्यांनी आभार मानले.
त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आता ब्रिटनमधील संग्रहालयासोबत करार झाला आहे. तीन वर्षांसाठी आपल्याला वाघनखे मिळणार आहेत. चंद्रपूरकराच्या हातून हे कार्य घडले याचा मला अभिमान आहे. लंडनला गेल्यावर मला आपल्याच देशात असल्यासारखे वाटले. तेथील सर्व शिवभक्त प्रेमाने एकत्र आले होते. सामंजस्य करार करण्यासाठी जात असताना ढोल ताशे वाजत होते. महिलांचा उत्साह बघायला मिळाला. भगव्या फेट्यांमधील शिवभक्त बघून तर मनात अभिमानाचे भाव होते. हे संपूर्ण वातावरण बघितल्यावर आपले जीवन सार्थकी लागल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.
’ ते पुढे म्हणाले, ‘ब्रिटनवरून जपानला गेलो. तिथे कोबे नावाच्या शहरात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताच्या वीर पुरुषांची ऐतिहासिक वारसा व पराक्रम बघून खूप अभिमान वाटत असल्याची भावना जपानी लोकांनी व्यक्त केली.’
हे तर चंद्रपूरचे भाग्य
‘आपल्याला अनेक चांगले निर्णय आणि उपक्रम करण्याची संधी मिळाली हे चंद्रपूरचे भाग्य आहे. गेल्यावर्षी खातेवाटप होताच सर्वांत पहिले आपण हॅलो ऐवजी वंदे मातरम् चा आदेश काढला आणि तो सर्वांनी आनंदाने स्वीकारला. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच आपण महाराष्ट्राला राज्य गीत दिले. अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्रांच्या मंदिरातील मुख्य प्रवेश दारासाठी आणि खिडकीसाठी आपल्या जिल्ह्यातील सागवान काष्ठ पाठविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा या संसद भवनाच्या इमारतीतील प्रत्येक दार चंद्रपूरच्या सागवन काष्ठाने तयार झाला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
धर्माचा नव्हे विचारांचा विरोध
‘५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, असे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीद, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही. अफजलखानाला आम्ही अत्याचाराच्या थर्मामीटरमध्येच मोजतो,’ असे ना.मुनगंटीवार यांनी म्हटले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘सुधीरभाऊ आगे बढो’
‘छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी पाठपुरावा सुरू केला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी अतिशय आनंदाने प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘सुधीरभाऊ आप आगे बढो… सरकार तुमच्या पाठिशी आहे.’ त्यानंतर ब्रिटीश एअरवेजने निघालो तेव्हा एका ईश्वरीय कार्यासाठी जात असल्याची भावना माझ्या मनात होती. कारण वाघनखाने एका व्यक्तिला मारले नव्हते तर हिंदवी स्वराज्य संपविण्यासाठी आलेला एक विचार संपवला होता,’ अशी भावना ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
रत्नजडित छत्र, पालखी अन् पुतळा
‘राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांच्या हातून पोंभूर्णातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणार असल्याचेही सांगितले.
अभी तो सिर्फ झाकी है!
‘मी भाजपचे काम करत येथवर पोहोचलो. पक्षाने जे दिले ते आनंदाने स्वीकारले. प्रदेशाध्यक्ष झालो, मंत्री झालो. पण पदासाठी नेत्यांना कधीच भेटलो नाही. पक्षाने मला सांस्कृतिक कार्य विभाग दिल्याचा खूप आनंद आहे. त्यामुळे आज अनेक निर्णय करता येत आहे. मात्र एवढ्यावर काम थांबलेले नाही. अजून महाराष्ट्रात जगातील सर्वांत सुंदर असे संग्रहालय करण्याचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवारही भारतात आणायची आहे. अभी तो सिर्फ झाकी है… अभी पुरा काम बाकी है,’ असा निर्धार ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
लंडनमध्ये महाराजांचा पुतळा
ना. मुनगंटीवार यांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘लंडनमधील भारतीय नागरिकांनी त्याठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला पाहिजे अशी मागणी केली. मी म्हणालो जागा द्या, लगेच कामाला लागू. लंडनमध्ये १६ खासदार भारतीय वंशाचे आहेत. पुतळ्यासोबत लाईट-साऊंड कार्यक्रम सुद्धा करण्याची तयारी केली आहे. आता तेथील खासदार पुढाकार घेऊन कामाला लागले आहेत.’
‘त्यावेळी मला मनापासून आनंद झाला’
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमातील आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘तेथील शिवभक्तांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग होता. या भेटीत महाराज वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचाही प्रसंग होता. पण ज्यावेळी अफजलखानाची भूमिका साकारणारा कलावंत ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा द्यायला लागला, त्यावेळी मला कमालीचा आनंद झाला.’