– ज्ञानेश्वरी ठाकरे यांनी उलगडला शिवरायांचा इतिहास
– ब्राह्मणी येथे शिवजयंती उत्साहात
– “शिवाजी कोण होता?” ग्रंथाचे वितरण
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखरच रयत धार्जिणे होते. त्यांनी आपल्या स्वराज्याची स्थापना करतांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनमानसात प्रेम, मैत्री, न्याय व समतेचीच शिकवण दिली. त्यांनी प्रत्येक स्त्रीचा मातेसमान सन्मान केला. म्हणूनच संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,मला संविधान लिहितांना कुठलीही समस्या जाणवली नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची संकल्पना होती. असे प्रतिपादन पत्रकार संदीप बलविर यांनी ब्राह्मणी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना केले.
आर्यन फायनान्स अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस द्वारा महाराष्ट्राचा मानबिंदू,मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारे रयतेचे राजे,श्रीमंतयोगी,छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून ब्राह्मणी ग्रा प सरपंच मनीषा थुलकर, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्हा ग्रामीण भीम पँथर अध्यक्ष सुमित कांबळे, उपसरपंच नितेश उरकुडे,ग्रा प सदस्य संघर्ष दुपट्टे, ललिता कुंभरे, सुनीता खैरे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कैलास खैरे, उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका आंबूलकर,काजल सगरकर,युगांती बिसेन प्रा.ज्ञानेश्वरी ठाकरे तर प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार संदीप बलविर हे होते. पुढे बोलतांना बलविर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती, गनिमी कावा,शेतकरी धोरण यावर विस्तृत मार्गदर्शन केले. तर शिवबा हे राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून निर्माण झालेला हिरा असे ज्ञानेश्वरी ठाकरे यांनी बोलतांना सांगितले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास माहीत व्हावा व त्यांच्यात वैचारिक क्रांती घडावी म्हणून आर्यन फायनान्स अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस चे संचालक आश्विन मोरे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.प्रास्ताविक अश्विन मोरे यांनी, संचालन फरकडे यांनी तर आभार ठाकरे यांनी केले.