Ø सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रम
Ø स्वाधारच्या विद्यार्थ्यांना निवड प्रमाणपत्राचे वाटप
यवतमाळ :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त प्राजक्ता इंगळे, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, शासकीय निवासी शाळेच्या विशेष अधिकारी-वर्ग-२ ज्योत्स्ना तिजारे, मुख्याध्यापिका भोयर, दत्ता खंडारे उपस्थित होते.
उपायुक्त प्राजक्ता इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा समता दिवस, शिक्षणाचा प्रसार दिवस असून या दिवशी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात येतो, असे सांगून विद्यार्थ्यांना आत्मचिंतनाची व वाचनाची गोडी शिक्षकाने लावावी, असे सांगितले. यावेळी अन्य उपस्थित मान्यवरांनी देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
राज्यातील शासकीय निवासी शाळांमधून 96 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा महागांव येथील पायल खंडारे हिचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. इयत्ता 10 वीच्या परिक्षेमध्ये महागाव येथील निवासी शाळेतून 90 टक्केच्यावर प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थीनीचा सुद्धा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
सर्व अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी व विद्यार्थीनींचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जिल्ह्यामध्ये 7 शासकीय निवासी शाळा असून सातही शाळेचा 100 टक्के निकाल लागल्यामुळे तेथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. बार्टीचे समन्वयक कर्मचारी यांनी महाडिबीटी अंतर्गत पार पाडलेल्या कामकाजाबाबत त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र, स्वाधार योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक विशेष अधिकारी ज्योत्स्ना तिजारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रा. कमल राठोड, यांनी केले. आभार कार्यालय अधिक्षक तुषार नांदूरकर यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाकरीता समाज कल्याण निरीक्षक मिनाक्षी मोटघरे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन
आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने व्यसनमुक्तीवर सुंदर पथनाट्य सादर केले. त्यांनतर पोस्ट ऑफीस चौकातून समता दिंडी काढण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा समान कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी दिंडीची सुरुवात केली. दिंडीमध्ये विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.