-युवा दिनानिमित्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युवांशी साधला संवाद
नागपूर, ता. १२ : स्वामी विवेकानंदांनी विद्वत्तेसह सदैव विनम्रता जपली. अनेकदा विविध प्रकारे चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही त्यांनी आपल्या विद्वत्ता आणि विनम्रतेने सर्व आरोपांना थोपविले. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील कुठल्याही भागातील युवाच्या ओठांवर असलेले गीत ठरवेल. स्वामी विवेकानंद यांच्या या विचाराबाबत आज आपल्या युवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आजचा आपल्या युवांच्या ओठांवरील गीतांतून त्यांच्या चारित्र्याची प्रचिती येते. चारित्र्य ही जगातील सर्वात मोठी बाब आहे. राष्ट्रनिर्माणासाठी युवांचे चारित्र्य महत्वाचे आहे. चारित्र्य जपा, चारित्र्यवान बना आणि राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१२) महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरातील युवांशी फेसबुक लाईव्ह माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या बालपणापासून ते विविध प्रेरणादायी प्रसंगांवर प्रकाश टाकला. बाल नरेंद्र हे सुरूवातीपासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. वडीलांसोबत शिवमंदिरात गेलेले बाल नरेंद्र शिवपिंडावर उंदिर पाहतात आणि जो देव स्वत:चे रक्षण करू शकत नाही तो इतरांचे काय करील, या भावनेने मूर्तीपूजेचा विरोध करतात. पुढे रामकृष्णन परमहंस यांच्या मार्गदर्शनात हे आर्य समाजाकडे आकृष्ट होतात, या प्रसंग महापौरांनी आपल्या ओजस्वी वाणीतून वर्णीला. स्वामी विवेकानंद हे अल्पआयुषी होते. मात्र त्यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे. अभ्यासात सातत्य असावे याबाबत सांगताना महापौरांनी स्वामी विवेकानंदांच्या शालेय जीवनातील प्रसंग कथन केला. परीक्षेच्या दिवशी सकाळी ते फुटबॉल खेळायचे. खेळणे झाल्यानंतर पेपरला जायचे. फुटबॉल खेळताना संपूर्ण मैदानात धावावे लागते. त्यामुळे श्वास खुलतो, ऑक्सिजन जास्त मिळते. ऑक्सिजन जास्त मिळाल्याने मस्तीक शांत होतो. शांत मस्तीकामुळे आरामात परीक्षा देता येते. हे त्यामागील स्वामीजींचे तर्क होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो दररोज नियमित अभ्यास करा. अपयशाने टोकाचे पाउल घेउ नका, असा संदेशही महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिला.
लोकवर्गीणीतून शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी सहभाग घेतला. जहाजाने हा प्रवास करीत असताना दोन अमेरिकींना त्यांनी चरित्र जपणा-या देशाबाबत त्यांना दिलेले सडेतोड उत्तर यावेळी महापौरांनी कथन केले. विश्व धर्मपरिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर आलेल्या अडचणी आणि त्यात आपल्याच लोकांद्वारे त्यांना अडचणीत टाकण्यासाठी झालेल्या प्रयत्नांबाबतही त्यांनी सांगितले. कोणत्याही कठीण प्रसंगांकडे निराशेच्या भावनेतून न पाहता त्यातून आशा शोधण्याचे दृष्टीकोन स्वामी विवेकानंदांनी दिले. परदेशात जिथे महिलांना दुय्यम स्थान दिले जायचे, महिला केवळ भोगवस्तू समजली जायची. अशा देशात जाउन भाषणाची सुरूवात करताना ‘माय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स’ असा उल्लेख करून विदेशातील भगीनींचा सन्मान केला. त्यांच्या या सन्मानाला विदेशातील भगीनींनीही उभे राहून टाळ्या वाजवून आभार मानले, या प्रसंगाचेही कथन यावेळी महापौरांनी केले.