महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी नागरी भागातील बेघरांना निवारा सुरू करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी रात्री सर्वेक्षण करून बेघरांना निवाऱ्यामध्ये आणण्यात येते. रात्रीच्यावेळी कोणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत. असे असले तरी अनेक जण या केंद्रात येत नाहीत. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्याना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.
नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणुन मनपा प्रशासनातर्फे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असुन याअंतर्गत महाकाली मंदिर, शनी मंदिर, मशीद ग्राउंड दर्गा व फूटपाथवरील बेघर लाभार्थ्यांना नगिनाबाग येथील सरदार पटेल शाळेतील बेघर निवाऱ्यामध्ये आणण्यात आले. येथे एकुण १२ बेघर लाभार्थी सध्या निवाऱ्यामध्ये वास्तव्यास आहे.