–पीएम गती शक्ती योजनेच्या दक्षिण विभागासाठी आयोजित परिषदेचे नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
नागपूर , 17 जानेवारी 2022 – विकास कार्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र तसेच राज्य सरकारांमध्ये समन्वय सहकार्य तसेच संवाद असणे आवश्यक आहे. पीएम गती शक्ती योजनेचा उद्देश हा कालबद्ध रीतीमध्ये काम पूर्ण करणे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. पीएम गती शक्ती या योजने अंतर्गत विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी दक्षिण विभागासाठी आयोजित एका परिषदेचे उद्घाटन आज नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दाक्षिणात्य राज्यातील कर्नाटक केरळ लक्षदीप पद्दुचेरी तामिळनाडू तेलंगाना यासोबतच अंदमान-निकोबार तसेच महाराष्ट्रामधील सचिव स्तरावरील अधिकारी तसेच कर्नाटक आणि पदुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सर्व मंत्रालय तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विभागांना समन्वय साधून एकीकृत पद्धतीने काम करून प्रकल्प वेळेच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन केले. प्रकल्प किमतीमध्ये वाहतूक खर्चात कपात करण्याकरिता पर्यावरणपूरक इंधने ,इथेनॉल मिथेनॉल तसेच सीएनजीचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. जलवाहतूक हा सर्वात स्वस्त पर्याय असून याचा वापर देशांतर्गत वाहतुकीसाठी जास्त प्रमाणात वाढला पाहिजे असेही त्यांनी सांगितलं. राज्यातील मंत्र्यांनी आपल्या राज्यातील प्रकल्पाविषयी या परीषदेत माहिती दिली तसेच प्रकल्प अंमलबजावणी येणाऱ्या अडचणींबाबत सुद्धा गडकरींना अवगत केले. केंद्र शासनातर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनाला करण्यात येईल प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळेच्या आत परवानग्या देऊन तसेच पारदर्शकपणे आपले काम करून प्रकल्पाचे काम गतिशील ठेवावे असेही आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.
या परिषदेत मंत्री मंडळातील सचिव स्तरावरील अधिकारी, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने उपस्थित होते