नागपूर : नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरसाठी मुळची नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे प्रतिदिवस 30 ते 35 टन कंप्रेस्ड बायो गॅसची (सीबीजी) निर्मीती केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत नेदरलँड कौंसिल जनरल बार्ट डे जाँग (Bart de Jong), सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंटचे सीईओ Jaap Veenenbos, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, कंपनीचे जॉईंट व्हेंचर पार्टनर अश्मी रोड कॅरिअर्सचे सीईओ प्यारे खान, एलओसी नागपूरचे संचालक केदार वझे, सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंटच्या भारतातील कार्यकारी संचालक वृंदा ठाकुर, कार्यकारी संचालक दिलीप कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागपूर शहराकरीता घनकचरा व्यवस्थापनाचा सुधारीत विस्तृत प्रकल्प अहवाल शासनाद्वारे 14 मे 2021 रोजी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये अंतर्भूत प्रमुख घटक् 600 TPD कम्पोस्टींग प्रकल्प आणि 380 MTPD MRF Centre करीता एकत्रितरित्या 1000+20% ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरीता मनपाद्वारे निविदा प्रसिध्द करण्यात आले. या निविदेनुसार सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीची नियुक्ती करण्यात आली.
नागपूर शहरातील कच-यावर प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्यासाठी सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीद्वारे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. घराघरातून निघणारा आणि भांडेवाडी येथे डम्प करण्यात आलेल्या दररोज १२०० मेट्रीक टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कच-यावर दररोज प्रक्रिया करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे, हे उल्लेखनीय आहे. या कच-यापासून उच्च दर्जाचे कम्पोस्ट, बायोगॅस तयार केले जाईल. संपूर्ण प्रकल्प zero waste with no tipping fees तत्वावर उभारण्यात येणार आहे. यामुळे महानगरपालिकेची मोठी बचत होईल. विशेष म्हणजे, कच-यावर प्रकिया करून पर्यावरणपूरकरित्या त्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात येणा-या प्रकल्पातून नागपूर महानगरपालिकेला वर्षाला १५ लक्ष रूपये रॉयल्टी स्वरूपात प्राप्त होणार आहेत. याशिवाय कार्बन क्रेडिटममधून देखील प्राप्त महसूलात मनपाचा ५० टक्के वाटा असेल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
नागपूर शहरातील कच-याचे संकलन आणि विल्हेवाट यावर मनपाद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून खर्च होत आलेला आहे. मात्र अद्ययावत तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक या प्रकल्पाच्या माध्यमातून मनपाला पहिल्यांदाच कच-यातून उत्पन्न मिळणार आहे. सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीसोबत झालेल्या करारानुसार सुरूवातीला १५ वर्षासाठी हा प्रकल्प असेल. यातील पहिल्या पाच वर्षात त्रयस्थ संस्थेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाईल यात सकारात्मकता आढळल्यास पुढे आणखी १५ वर्षासाठी प्रकल्पाचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी सदर कंपनीला मनपाद्वारे ३० एकर जागा लीजवर दिली जाणार आहे. येत्या वर्षभरात संपूर्ण प्रकल्प शहरात कार्यान्वित होईल, असा विश्वास देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर शहरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावून शहरात निर्माण होणा-या कच-याचा वेगवेगळ्या माध्यमातून पूनर्वापर व्हावा या मनपाचा मानस आहे. शहर कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाउल असून या संपूर्ण कार्यात शहरातील प्रत्येक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणारा कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा संकलीत करण्यात येतो. मात्र अद्यापही काही नागरिक कचरा व्यवस्थित विलग करून कचरा संकलन करणा-या गाडीत टाकत नसल्याचे दिसून येत आहे. सर्व नागरिकांनी कच-याचे ओला आणि सुका असे योग्य विलगीकरण करूनच कचरा संकलीत करावा, असे आवाहनही यावेळी मनपा आयुक्तांनी शहरातील जनतेला केले आहे.
नेदरलँड कौंसिल जनरल बार्ट डे जाँग (Bart de Jong) यांनी सांगितले की, आम्ही कचरा व्यवस्थापनासाठी भारतासोबत मिळून काम करत आहोत. भारताची लोकसंख्या मोठी आहे. अश्यात कच-याची व्यवस्थापन आणि विल्हेवाट यासाठी लँडफील पध्दतीवरच अवलंबुन न राहता इतर पर्याय शोधण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट संदर्भात आम्ही अनेक वर्षापासून कार्य करीत आहोत. आमच्या अनुभवाच्या नागपूरला नक्की फायदा होईल.
सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंटचे सीईओ Jaap Veenenbos म्हणाले की, नागपूरात उभारल्या जाणा-या प्रकल्पातुन प्रतिदिवस 30 ते 35 टन सीबीजी निर्माण केले जाईल. भविष्यात याचा मोठा फायदा होणार आहे.