कन्हान :- मोकाट जनावरांच्या झुंडींमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर तसेच इतर मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर शहरातील मुख्य मार्गावरदेखील अशीच परिस्थिती लक्षात घेता वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत.
कन्हान शहरातील गांधी चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा चौक, नाका नंबर सात चौक, हे वर्दळी चे ठिकाण असून या मुख्य चौकात मोकाट जनावरांच्या ठिय्या असते.
येणार जाणारा नागरिकांना मोकाट जनावरामुळे किरकोळ अपघात होऊ लागले आहेत. मात्र स्थानिक प्रशासन या कडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित विभागाला मोठा अपघात हवा का ?असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्याने शासनाने पारित केलेला कायदा आणि त्याकरिता सज्ज देखभाल यंत्रणाच कुचकामी असल्याचे सिद्ध होते. संबंधित रस्ता सुरक्षा विभाग कायद्याची अंमलबजावणी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात तसेच महामार्गावर ठिकठिकाणी जनावरांचे साम्राज्य बघायला मिळत असून त्याचा वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागतो. मोकाट जनावर रस्त्यावर आडवे आल्याने अनेक अपघात झाल्याचे चित्र समोर आले आहेत. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल कारणे गरजेचे आहे. मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
नगरप्रशासनाने काळजी घेण्याची गरज :- कन्हान येथील आठवड़ी व गुजरी बाजार महामार्गावर भरत असल्याने येथे भाजीपाला व फळ विक्रेत्याकडून उरलेला ( खराब ) माल रस्त्यावरच फेकला जात असतो. ते खाण्यासाठी जनावरे गोळा होतात यावर आळा घालण्यासाठी सदर विक्रेत्याना कचरा संकलन गाड़ी मध्ये कचरा जमा करण्याबाबद नगर परिषद प्रशासनाने सूचना करावी ज्यामुळे जनावरे महामार्गावर ठिय्या मांडून बसणार नाही जेणेकरून अपघाताची शक्यता कमी होईल