– मनपाच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांची कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन्स कार्यालयामध्ये कुंड्यांची तोडफोड करुन नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपाच्या वतीने सहायक आयुक्त श्याम कापसे यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मनपाच्या तक्रारीवरुन वसीम लाला, वय अंदाजे ३२ वर्षे, रा. मोमोनपुरा, नागपूर, प्रमोद ठाकुर, वय अंदाजे २५ वर्षे, रा. पेंशन नगर, पोलिस लाईन टाकळी, नागपूर, ओम तिवस्कर, वय अंदाजे ३२ वर्षे, रा. पेंशन नगर, पोलिस लाईन टाकळी, नागपूर, समीर रॉय, वय अंदाजे ३५ वर्षे, रा. गिट्टीखदान, काटोल रोड नागपूर, मिलींद दुपारे, वय अंदाजे ३५ वर्षे, रा. रघुजीनगर, नागपूर, लंकेश उके, वय अंदाजे ४० वर्षे, रा. उत्तर नागपूर या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३२४ (३), १८९(२) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम-१९५१ च्या १३५ या कलमान्वये गुन्हा सदर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी ४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे कार्यकर्त्यांद्वारे शहरातील विविध समस्या व मनपाच्या बेजबाबदार कारभाराचा ठपका ठेवत संतप्त आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त होता. आंदोलनानंतर आमदार विकास ठाकरे व काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. दुपारी १२.१० वाजेदरम्यान सर्व कार्यकर्ते निघून जातेवेळी वसीम लाला, प्रमोद ठाकुर, ओम तिवस्कर, समीर रॉय, मिलींद दुपारे, लंकेश उके यांनी मनपा मुख्यालय इमारतीच्या मुख्य दारापुढे प्रथम मटके फोडले व नंतर मुख्यालयाच्या दालनाच्या मुख्य दारात असलेल्या कुंड्यांची नासधूस केली. तसेच उपरोक्त सर्वांनी पोलिसांच्या मोर्चा संबंधिच्या शासकीय मनाई आदेशाचे उल्लंघन केले. याची दखल घेत सदर पोलिसांनी उपरोक्त सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.