यवतमाळ :- जिल्ह्यातील राज्य शासनाच्या वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या मानधनधारक कलावंतांना डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात मानधन जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कलावंतांनी यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालकांच्या पत्रान्वये कलावंताचे मानधन हे दि.१ एप्रिल पासून डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व मानधनधारक कलावंतांची आधारसलंग्न बँक खात्याची माहिती, आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांकाची माहिती दि.१० मार्च पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
सर्व मानधनधारक कलावंतानी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक तसेच जे कलावंत मय्यत झाले असतील त्यांच्या मृत्यु प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत इत्यादी माहिती समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ व संबधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास सादर करावी,असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी कळविले आहे.