Ø विभागातील व्यापारी संघटनांसोबत बैठक
Ø ईको-टुरिझम सह नाविन्यपूर्ण उत्पादनाला प्राधान्य
Ø टुरिझम फेसटिव्हल सारखे विविध उपक्रम राबविणार
नागपूर :- उद्योगांच्या विकासासोबत विभागातील विविध व्यवसायिकांनी नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश केल्यास आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल. व्यवसाय वृद्धीसाठी ईको-टुरिझम सारख्या संकल्पना राबविल्यास व्यापारी संघटनांचे विभागाच्या विकासात भरिव योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनीधीसोबत विशेष बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी बोलत होत्या. यावेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कैलास जोगानी, चेंबर्स ऑफ स्मॉल इंडस्ट्रिजचे अध्यक्ष जुल्फेश शहा, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी प्रदिप जाजू, तरूण निर्बाण, प्रशांत जग्यासी, संजय पांडे, गोविंद पसारी, विजय जयस्वाल तसेच चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रिज असोसेएशचे नितीन अलशी उपस्थित होते.
विभागातील उद्योग व व्यवसायला चालना देण्यासाठी तसेच व्यापारी संघटनांच्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी विविध संघनांसोबत व्यावसायीकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत उद्योजकांचे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात साम्यंज्यस करार करण्यात आले त्याअनुषंगाने विभागातील व्यापारी संघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
व्यापरामध्ये पारंपारिकेसोबतच नाविन्यूपर्ण उत्पादनांचा समावेश करण्याचे आवाहन करतांना बिदरी म्हणाल्या की, विविध नाविन्यपूर्ण उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असून यामध्ये चिया सिडीस्, आव्हाकाडो यासारख्या फळांचा समावेश असून ईको-टुरिझमसारख्या संकल्पनांचा समावेश करण्यात यावा, असे आवाहन यावेळी बिदरी यांनी केले.
व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतांना विविध प्रतिनिधींनी अतिरीक्त विद्यूत दर, टुरिझम फेसटिव्हल आयोजित करणे, क्रशर उद्योगाकरिता जागेची निवड, बाजारपेठेतील अतिक्रमण तसेच स्टिल उद्योगाकरिता कौशल्य आधारित अभ्यासक्रम आदी विषयासंदर्भात चर्चा केली. व्यापारांच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल आणि व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीला प्राधान्य द्यावे अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी केल्या.
प्रारंभी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी प्रास्ताविकात शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली.