बचतगटांच्या उत्पादनांना लोकाश्रय दिल्याबद्दल प्रशासनाने व्यक्त केले आभार
तीनही दिवस नागपुरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एक हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
नागपूर : ग्रामीण भागातील महिलांना नवनव्या उद्योगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि विपणन क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ व स्पर्धा उपलब्ध करून देणाऱ्या सरस वस्तू विक्री प्रदर्शनीचा रविवारी उशिरा समारोप झाला. प्रचंड उन्हाचा तडाखा असतानाही या 3 दिवसात ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी 67 लक्ष रुपयांचा व्यवसाय केला आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, महिला व बाल कल्याण व आरोग्य विभागांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर विभागातील 150 पेक्षा अधिक बचतगटांच्या उत्पादनांचे स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार, नव उद्योजकता तसेच बाजाराशी सुसंगत स्पर्धात्मक दृष्टीने सक्षम करून कायमस्वरूपी उपजीविका मिळविण्याकरिता प्रोत्साहित करण्याचा सरस विक्री प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश होता.
विभागस्तरीय सरस मेळाव्यामध्ये तीन तारखेला 17 लक्ष रुपयांची विक्री झाली होती, तर शनिवारी 22 लक्ष रुपयांची विक्री झाली आहे. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत नागपूरकर जनतेने याठिकाणी गर्दी केली होती. तिसऱ्या दिवशी एकूण 28 लक्ष रुपयांचा व्यवसाय झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यासाठी नागपूरकर जनतेचे आभार व्यक्त केले आहे.
अतिशय ऊन्हाचे दिवस असताना व्यापार उद्योग समूहातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी,आपल्या कुटुंबासह या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे बचत गटांचा उत्साह वाढला आहे. उद्योगाभिमुख समाज निर्मितीसाठी अशा मदतीचा, पुढाकाराचा, कौतुकाचा उपयोग होतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
या तीन दिवसीय मेळाव्यामध्ये आरोग्य विभागाचा सक्रिय सहभाग लक्षणीय होता जवळपास बाराशे नागरिकांची तपासणी याठिकाणी करण्यात आली. प्रयोग शाळा या ठिकाणी उभारण्यात आली होती जनतेला लगेच त्यांच्या मोबाईलवर रिपोर्ट मिळत होते. तसेच शुगर बीपी तपासणी तात्काळ केली जात होती समुपदेशनासाठी तज्ञ डॉक्टरांची चमू कार्यरत होती. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या आरोग्य तपासणी वर देखील भर दिला.
सदर आरोग्य तपासणी यशस्वी होण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. इनामदार जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुरेश मोटे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दामले आयुर्वेद विस्तार अधिकारी डॉ. भोवरे डॉ. सचिन हेमके तसेच आयजीएमसी व जीएमसी, डागा व होप हॉस्पिटल, नागपूर, हिंद लब नागपूर व सिकल सेल, एनसीडी व राष्ट्रीय कॅन्सर तुकडोजी रुग्णालय येथील चमू यांचे सहकार्य लाभले.
यावर्षी आयोजित सरस मेळावा लक्षणीय ठरला असून राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक व त्यांना ऐकण्यासाठी बारा हजारावर महिला उपस्थित होत्या. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी या उत्साहाला लक्षात घेवून जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा व तालुकास्तरावर बचतगटांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र सुरु करण्याची घोषणा केली आहे. महिलांच्या आर्थिक उलाढालींसाठी यामुळे गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही महिला बचतगटांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था करून देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.