नागपूर -नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांची अनावश्यक ढवळाढवळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन अनावश्यक ढवळाढवळ करु नये अशी विनंती केली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बुद्धीस्ट स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दिला.
पाली पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून प्रा. डॉ. नीरज बोधी यांच्यावर जबाबदारी असताना त्यांच्यावर बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभाग व आंबेडकर अध्यासनाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
या दोन्ही विभागात प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून त्या भरण्याची वारंवार विनंती केली असताना सुद्धा त्या भरण्यात आलेल्या नाहीत, उलट पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागात ऑनलाइन क्लासेस सुरळीत सुरू असताना व पहिले सत्र संपण्याच्या उंबरठ्यावर आणि परीक्षा जवळ आली असताना विभाग प्रमुखांना विश्वासात न घेता योग्य व अनुभवी प्राध्यापकांना कमी करून मधेच नवीन व्यक्तींची (प्राध्यापक) नियुक्ती करण्याचा खटाटोप कुलगुरू करीत आहेत हे विद्यार्थ्यांना कळताच.
विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ विभाग प्रमुख व प्राध्यापकांना घेऊन थेट कुलगुरु डाॅ सुभाष चौधरी याचेकडे दोन दिवस धडकुन आज विद्यार्थ्यांनी याबाबत जाब विचारला. परंतु विद्यार्थ्यांचे समाधान कुलगुरू करू शकले नाही.
विद्यार्थ्यांनी आरोप केला की बौद्ध व आंबेडकरी विचारांशी निगडीत सुरळित सुरू असलेल्या या विभागाला जाणून बुजून अडचणीत आणून भांडणे लावण्याचे व बदनाम करण्याचे कारस्थान रचित नाही ना? याचा जाबही कुलगुरूंना विचारला.
नागपूर ही बाबासाहेब डाॅ.आंबेडकर यांची धम्मभूमी आहे, त्यामुळे येथे आंबेडकरी विद्यार्थी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत निर्णयाचा फेरविचार करण्याचा व बुद्धाचा मध्यम मार्ग काढण्याची आग्रही मागणी केली.
बुद्धीस्ट स्टुडंट असोसिएशन (BSA) मागील दोन वर्षापासून रखडलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या वास्तूचे लोकार्पण व्हावे, त्यात अत्याधुनिक ग्रंथालय व कुशल ग्रंथपालाची नियुक्ती व्हावी, पेट परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएचडी गाईडची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा पाठपुरावा करीत आहे.
परंतु याकडे लक्ष न देता कुलगुरू अवांछनीय हेतूने अनावश्यक लक्ष घालीत असल्याचा आरोप करुन विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप टाळण्याची विनंती केली, ज्याला कुलगुरूंनीनी शेवटी मान्यता दिली.
या शिष्टमंडळात बुद्धीस्ट स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष भिख्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, उपाध्यक्ष नरेश मेश्राम, सखारामजी मंडपे, सिद्धार्थ फोपरे, श्यामराव हाडके, परशराम पाटील, हिरालाल मेश्राम, जगन्नाथ पोहेकर, बबन मोटघरे, अरुण मेश्राम, विभाग प्रमुख प्रा. डॉ नीरज बोधी, अंशकालीन प्राध्यापक डॉ. रेखा बडोले, प्रा सुजित बोधी, प्रा सरोज वाणी, प्रा ज्वाला डोहाणे प्रा वसुंधरा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.