नागपूर :- सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे शारीरिक गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या 144 व्या स्मृतिदिन निमित्ताने कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, माजी जिल्हा प्रभारी सुमंत गणवीर, युवा नेते सदानंद जामगडे, पश्चिम नागपूर विधानसभेचे अध्यक्ष अंकित थुल आदींनी वस्ताद लहुजी साळवे उद्यान (अंबाझरी गार्डन) येथील लहुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले बार्टीचे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप व वाचन करण्यात आले.
महात्मा फुले हे शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत असताना तत्कालीन प्रस्थापित जातीयवादी मंडळी महात्मा फुलेंना विरोध करीत होती, त्यावेळी वस्ताद लहुजी हे महात्मा फुले यांच्या बाजूने उभे राहिले, एवढेच नव्हे तर सावित्रीबाई शिक्षण कार्य करीत असताना धर्म बुडवीत असल्याचा आव आणणारी मंडळी सावित्री बाईचा छळ करीत होती. त्यावेळी लहुजी सावित्री बाईंच्या पाठीशी अंगरक्षक म्हणून सावली सारखे उभे राहिले होते, त्यामुळे फुले दांपत्य हे ऐतिहासिक कार्य करू शकले, म्हणून फुले दांपत्याच्या कार्यात लहुजींचा मोठा वाटा असल्याचे मनोगत याप्रसंगी बसपा नेत्यांनी व्यक्त केले.