नागपूर :- नागपूर महानगर पालिकेने 28 फेब्रुवारी 2014 रोजी टेका नाका व नारीरोड याचे नामकरण करून मान्यवर कांशीराम टी पॉईंट व मान्यवर कांशीराम मार्ग असे नामकरण केले व त्याचे रीतशीर शिलान्यासही लावले. त्यामुळे तेथील महा मेट्रोरेल स्टेशनला मान्यवर कांशीराम महा मेट्रोरेल स्टेशन असे नाव द्यावे या प्रमुख मागणीसाठी महा मेट्रोचे नवनियुक्त व्यवस्थाप कीय संचालक श्रावण हर्डीकर यांचे आज बसपाच्या शिष्टमंडळाने स्वागत करून त्यांना निवेदनही दिले
शिष्टमंडळात नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के व नरेश वासनिक, महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, मनपा सभापती गौतम पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजू चांदेकर, दक्षिण नागपूरचे प्रभारी नितीन वंजारी, युवा नेते सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, भन्ते डॉ धम्मोदय प्रामुख्याने उपस्थित होते.
कामठी रोडवरील कांशीराम मार्गावर प्रस्तावित असलेल्या नारी स्टेशनला कांशीरामजींचे नाव द्यावे यासाठी 15 फेब्रुवारी 2021, 24 फेब्रुवारी 2022, 1 आक्टोंबर 2022 रोजी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांना निवेदने देण्यात आली. या मार्गावर बसपाचे प्रांतीय कार्यालय असून कांशीरामजी अनेकदा येथे येऊन गेले हे विशेष. दरम्यान नागपुरात तीन स्टेशनची नावे दुरुस्त करून बदलविण्यात सुद्धा आली. परंतु ही रास्त मागणी असताना मागणी नंतरही त्या स्टेशनला अवैधरित्या व दृष्ट हेतुने नारी हेच नाव देण्यात आले याचा बसपा ने निषेध केला.
बसपाने माहिती अधिकारात जी माहिती मिळवली त्याच बराच गोलमाल असल्याचा आरोप बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केलेला आहे. 9 आक्टोंबर रोजी कांशीरामजींचा स्मृती दिवस असल्याने त्यापूर्वी स्टेशनच्या नामकरणाचा प्रस्ताव पास करावा अन्यथा बसपा उग्र आंदोलन करेल असा याप्रसंगी बसपा तर्फे इशारा देण्यात आला.
यापूर्वी शहरातील अनेक मेट्रो स्टेशनच्या नावांच्या दुरुस्तीची व नावे बदलाच्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्यात सेंट्रल एवेन्यू रोड वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेट्रो स्टेशन, रहाटे चौकातील स्टेशनला दीक्षाभूमी मेट्रो स्टेशन, विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कस्तुरचंद पार्क येथील स्टेशनला संविधान चौक मेट्रो स्टेशन, धरमपेठ सायन्स कॉलेज येथील स्टेशनला वस्ताद लहुजी साळवे मेट्रो स्टेशन, कॉटन मार्केट येथील स्टेशनला महात्मा फुले मार्केट मेट्रो स्टेशन आदि नावांच्या दुरुस्त्या व सूचना करण्यात आल्या होत्या त्याचा उल्लेख याप्रसंगी करण्यात आला.