– धापेवाडा येथे ‘गाव चलो’ अभियानात कार्यकर्त्यांना आवाहन
नागपूर :- मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी ज्या भागात आपल्याला गेल्या निवडणुकीत कमी मते पडली, त्या ठिकाणी जाऊन संपर्क अभियान राबवावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी ‘गाव चलो’ अभियानात कार्यकर्त्यांना केले.
सावनेर विधानसभा क्षेत्रातील धापेवाडा येथे हे अभियान आयोजित करण्यात आले. याअंतर्गत ना. गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सोबतच धापेवाडा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्री महोदयांनी अभिवादन केले. धापेवाडा ग्रामपंचायत जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. धापेवाडा येथील कोलबास्वामी मंदिर व रवी रुद्रप्रताप सिंह पवार यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी भेट दिली.
भाजपाच्या ‘दिवार लेखन’ अभियानांतर्गत ना. गडकरी यांनी पवार यांच्या वाड्याच्या भिंतीवर कमळाचे चित्र रेखाटले. पूर्ती एग्रोटेक परिसरात आयोजित सभेत ना. गडकरी यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आवाहन केले. ना. गडकरी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना म्हणाले, ‘कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करतील. पण अपप्रचारांवर विश्वास न ठेवता आपल्या विचारांशी आणि पक्षाशी प्रामाणिक राहावे. गावातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या भागात किती मतदान केंद्रे आहेत, गेल्या वेळी किती मते पडली, हे बघून ज्या भागात कमी यश आले, तिथे जाऊन आपल्या कामांची माहिती लोकांना द्या.’ सावनेर विधानसभेतील सुपर वॉरियर्स व जिल्हा कोअर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लीकार्जून रेड्डी माजी आमदार आशीष देशमुख, माजी आमदार अशोक मानकर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार व अरविंद गजभिये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर, धापेवाड्याच्या सरपंच मंगला शेटे, राजू शेटे, संजय टेकाडे, दिलीप धोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
धापेवाड्यातील विकास कामांसाठी १६० कोटी
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी धापेवाडा येथील विविध विकास कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. त्याचवेळी धापेवाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाजी चौकातील पवार वाड्यामध्ये विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, संवाद व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधला. धापेवाडा टेक्स्टाईल सोसायटीच्या माध्यमातून १६० महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काळात आणखी ६०० महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराचे दालन खुले केले जाईल, असेही ना. गडकरी म्हणाले.