करार व्यवस्थापन क्षेत्रात उज्वल भविष्य – काॅग्निजंटचे संज्योत बुचे यांचे प्रतिपादन

– पदव्युत्तर विधी विभागात अतिथी व्याख्यान

नागपूर :- करार व्यवस्थापन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकरिता उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन काॅग्निजंटचे सहयोगी संचालक संज्योत बुचे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागात गुरुवार, दिनांक ११ मे २०२३ रोजी अतिथी व्याख्यान करताना ते बोलत होते. पदव्युत्तर विधी विभाग, रोजगार व प्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमाला पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे, विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन आदी उपस्थित होते.

करार व्यवस्थापन या विषयावरील अतिथी व्याख्यान करताना बुचे यांनी त्यातील मुख्य तीन भागांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. करार व्यवस्थापन क्षेत्रात तब्बल २० वर्षांचा असलेला अनुभव त्यांनी यावेळी विषद केला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण असलेले मुलाखतीचे तंत्र त्यांनी यावेळी शिकविले. कोणत्याही कंपनीमध्ये मुलाखतीकरिता जात असताना परिचयपत्र आणि स्वतःमधील आत्मविश्वास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परिचयपत्र तयार करताना केवळ अनुभवाचा उल्लेख न करता त्यामध्ये कामाच्या अनुभवाचे स्वरूप विषद करावे. कठीण परिस्थितीमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचा त्यामध्ये अंतर्भाव असावा. परिचयपत्र मधील ९५ टक्के बाबी ह्या कंपनीला अपेक्षित असणाऱ्या असाव्यात. त्यामुळे मुलाखत प्रक्रिया सुरळीत होऊन संबंधित पदाकरिता तुमची दावेदारी अधिक प्रबळ होते. मुलाखतीला सामोरे जाताना संभाषण कौशल्य अंगीकृत असणे आवश्यक आहे. यावेळी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांची यादी तयार असणे अपेक्षित असून त्या दिशेने तयारी करावी. मुलाखतीमध्ये सादरीकरणाचे महत्त्व देखील त्यांनी पटवून दिले. पदाशी संबंधित प्रश्नांपासून मुलाखत देण्यास सुरुवात केल्यास तुमचे ५० टक्के काम झालेले असते. सोबतच मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याचा सल्ला बुचे यांनी दिला.

अतिथी व्याख्यानामध्ये पुढे बोलताना त्यांनी contract life cycle management (CLM) बाबत विस्तृत विवेचन केले. करार व्यवस्थापनाशी संबंधित विविध बाबी त्यांनी समजावून सांगितल्या. याशिवाय त्यांनी आयटी सेवा, टॅक्स, इन्व्हाइस आधी विविध प्रकारच्या सेवांबाबत माहिती दिली. करार व्यवस्थापन क्षेत्रातील विविध बाबींचा अभ्यास केल्यास चांगले करार व्यवस्थापक होता येते, असे बुचे म्हणाले. कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यापूर्वी विषय समजून घ्यावा. प्रत्येक गोष्ट समजून घेतल्यानंतर प्रकरणासाठी तयार राहा असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान देखील बुचे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे यांनी अतिथी व्याख्याते संज्योत बुचे यांच्याबाबत माहिती दिली. शिवाय मुलाखतीमध्ये सादरीकरणाला अधिक महत्त्व असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत विकास परिषदेची रविवारी संकल्प कार्यशाळा

Fri May 12 , 2023
नागपुर :- सेवा क्षेत्रात कार्यरत भारत विकास परिषदेच्या विदर्भ प्रांत संकल्प कार्यशाळेचे आयोजन रविवार दि. १४ में रोजी नागपुरात करण्यात आले आहे. श्री अग्रसेन भवन, गांधीबाग, नागपूर येथे ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेला भारत विकास परिषदेच्या विदर्भातील सर्व शाखा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहतील. दोन सत्रात कार्यशाळा होईल. खादी आणि ग्रामोदय कमिशनचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता दीप प्रज्वलन करून संकल्प कार्यशाळेची सुरुवात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com