नागपूर :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास आवश्यक आहे. त्यासाठी समाजात उद्यमशीलता वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्राच्या वतीने शैक्षणिक मार्गदर्शन व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे नागपूर शहर अनुसुचित जाती आघाडीचे अध्यक्ष राजेश हाथीबेड, भाजपचे अनुसुचित जाती आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे आदींची उपस्थिती होती. यावेळी २५० गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी म्हणाले, ‘लोकांचे राहणीमान, व्यवहार आणि व्यक्तिमत्वाच्या आधारावर समाजाचे मुल्यांकन होत असते. त्यावरच सामाजिक विकास अवलंबुन आहे. याशिवाय शैक्षणिक आणि आर्थिक विकासही अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजात गुणवान लोक तयार होणे आणि चांगले उद्योजक तयार होणेही आवश्यक आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले तंत्रज्ञान स्वीकारा, ज्ञान प्राप्त करा, रोजगारासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करा आणि ज्ञानाच्या आधारावर उद्यमशीलताही वाढवा.’ समाजातील उपेक्षित, दलित, शोषित पीडितांच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचा विश्वासही ना. गडकरी यांनी यावेळी दिला.