नागपूर :- स्वतः डब्बा मोबाईल वापरून वडिलाने त्याला महागतला मोबाईल घेऊन दिला. मात्र,आयुष्याची स्वप्न पाहात असताना तो वास्तवाला विसरला. मोबाईलचा अतिरेक वाढल्याने त्याची झोप उडाली. भूक, तहाण विसरला. मोबाईल शिवाय तो जगूच शकत नव्हता, घरी जाण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. लोहमार्ग पोलिसांनी समूपदेशन करून त्याला पालकाच्या सुपूर्द केले.
अमरावतीचा राजेश (काल्पनिक नाव) आता 12 वीला गेला. त्याला आई वडिल आणि एक लहान भाउ आहे. वडिल खाजगी कंपनीत काम करतात. मोबाईल मुळे नवीन नवीन माहिती मिळेल आणि शिक्षणात प्रगती करण्यास मदत होईल, या उद्देशाने वडिलांनी त्याला मोबाईल दिला. मात्र, मोबाईलमध्ये इतका व्यस्त झाला की, भुक, तहाण आणि झोपही उडाली. एवढेच काय तर आई वडिल, मित्र आणि नातेसंबधही विसरला, 15 तास तो मोबाईलवर असायचा. मोबाईलच्या अतिरेकाने तणाव वाढत गेला आणि त्याला काही सुचेनासे झाले. दरम्यान वडिलांनी त्याला चुलत भावाकडे डोंगरगढला पाठविले. नागपूर रेल्वे स्थानकाहून गाडी बसविले आणि वडिल निघाले. मात्र, तो भावाच्या घरी गेलाच नाही. बिलासपूरहून परताला, नागपूर रेल्वे स्थानकावर आला. प्लॅटफार्म क्रमांक 8 च्या दिशेने स्टेशन बाहेर पडला आणि एका कार चालकाला लिफ्ट मागितली. एका लॉजवर पोहोचला.
राजेशची खात्री करण्यासाठी वडिलांनी डोंगरला फोन करून विचारणा केली. मात्र, राजेश आलाच नाही हे वाक्य एैकताच वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना सर्व माहिती सांगितली.
घरी जाण्यासाठी घातली अट
राजेश असामाजिक तत्वांच्या हाती लागू नये किंवा स्वतचे बरे वाईट करून घेवू नये अशी भीती होती. लगेच पोलिस शिपाई रोशन मोगरे, मझअर अली, पप्पू मिश्रा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून लॉज पर्यंत पोहोचले. राजेश लॉजमध्येच होता. मात्र, त्याने घरी जाण्यास नकार दिला. मनीषा काशीद यांनी समुपदेश केल्यानंतर त्याला वडिलांच्या सुपूर्द केले.