मुंबई :- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव संदीप लेले आदी याप्रसंगी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात राज्यभर ‘धन्यवाद मोदीजी लाभार्थी संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानात मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे पाठवली जात आहेत. फ्रेंड्स ऑफ बीजेपी सारख्या उपक्रमातून भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी सहमत असणार्या तसेच पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असणार्या समाजातील मान्यवरांना पक्ष संघटनेशी जोडले जात आहे. संपूर्ण राज्यभर बूथ पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.
मोदी सरकारने गरीब कल्याणच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर देशाला सामर्थ्यशाली, समृद्ध बनवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांना यश मिळत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मोदी सरकारप्रमाणेच विविध समाजसघटकांच्या कल्याणाच्या योजना आखत आहे. अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महविकास आघाडी सरकारने जनकल्याणाची कोणतीच कामे केली नाहीत. ‘फेसबुक लाईव्ह सरकार’ जावून आता कार्यक्षम सरकार आले आहे. या सरकारने शेतकर्यांना 7 हजार कोटींची मदत केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात घेतले आहेत, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिनाच्या सरकारमुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवली जातील, त्याचबरोबर संघटन मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासह 45 पेक्षा अधिक जागा तर विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही साध्य करू, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.