– थायलंड व भारताच्या शिष्टमंडळाने घेतली दलाईलामांची भेट
नागपूर :-गगन मलिक फाऊडेशनच्या पुढाकाराने नागपूर-वर्धा मार्गावर उभारल्या जाणाऱ्या भिक्षू तसेच श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे.
यासंदर्भात थायलंड आणि भारताचे एक शिष्टमंडळ दलाई लामा यांची भेट घेण्यासाठी धर्मशाला येथे गेले होते. दरम्यान दलाई लामा यांनी शिष्टमंडळाला नागपुरात येण्याचे आश्वासन दिले.
गगन मलिक फाऊडेशनच्या पुढाकाराने नागपूर वर्धा मार्गावरील 14 एकरच्या भव्य परिसरात भिक्षू तसेच श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची भव्य इमारत उभी राहणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात बौद्ध भिक्षू तसेच श्रामनेर यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी देश विदेशातून बौद्ध धम्म प्रशिक्षक येऊन प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण केंद्रात ज्या मुलांची भिक्षुक किंवा श्रामनेर बनण्याची इच्छा आहे अशा लोकांना बौद्ध भिक्षू आणि श्रामनेर होण्याचे धडे गिरवल्या जाणार आहेत. आचरण, भगवान बुद्धांचे विचार, संस्कार आदींचे धडे या प्रशिक्षण केंद्रात गिरविले जाणार आहेत.
शिष्टमंडळात थायलंडचे कॅप्टन नटाकटी, भारताचे गगन मलिक फाऊडेशनचे अध्यक्ष गगन मलिक, राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये, पी. एस. खोब्रागडे, विनयबोधी डोंगरे, स्मिता वाकडे, भंते आनंद (कर्नाटक), प्रशांत ढेंगरे (नागपूर), रवी सवाईतुल (नागपूर) आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.