‘एकेडी’ चे राष्ट्रपती होणे ! 

 

रोजंदारी ठेका मजुराचा मुलगा देशाचा राष्ट्रपती झालाय !

शेजारच्या श्रीलंकेत हे घडले. गरीबी हलाखीची पार्श्वभूमी असलेले ध्येयी, ध्येयवादाच्या जोरावर राजकारणात यशस्वी होतांनाचे दिसत आहे. अनुरा कुमारा दिसानायके हे ताजे उदाहरण ठरावे. त्यांना सारे ‘एकेडी’ म्हणतात. ते ५५ चे आहेत.

एकेडी श्रीलंकेचे नववे नवे राष्ट्रपती झालेले आहेत.

गळत्या घरातून आलेले देशाच्या सर्वोच्च पदी जाणे सारे थरारक आहे. एकेडी चे वडील रोजंदारी ठेका मजूर होते. थंबुट्टेगामा या गावी ते रहायचे. विद्यापीठीय शिक्षण घ्यायला शहरात जाणारे एकेडी हे त्या गावातील पहिले विद्यार्थी होते. तिथेच ते घडत घडत घडले.

नुकतीच राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. तीत एकेडी ने केलेल्या आर्थिक प्रश्नांच्या चौफेर लक्षवेधितेने त्यांना विजय’माळा घातली.

विद्यापीठीय शिक्षण घेतांनाच ते मार्क्सवादी झाले. चळवळीशी जुळले. विद्यार्थी नेता झाले. नंतर जनता विमुक्त पेरामुना (जेव्हीपी) या डाव्या पक्षाचे झाले. पूढे या पक्षाच्या विद्यार्थी विंगचे राष्ट्रीय संयोजक झाले. याच चढत्या प्रवाहात देशाची राजधानी कोलंबो इथून खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांचे वय ३२ होते.

२०१४ ला एकेडी आपल्या जेव्हीपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व नेते झाले. या पक्षावर तो हिंसक कारवायात असतो हा आरोप होता. एकेडी ने तो स्वच्छ केला. आता तो लोकप्रिय पक्ष झाला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत ७५ टक्के मतदान झाले. विद्यार्थी, युवक, कामगार, कलावंत, बुद्धिजीवी यांनी अनुरा एकेडी ची उमेदवारी उचलून धरल्याचे स्पष्ट झालेय.

काही काळ त्यांनी मंत्री पदही भूषविले. स्वच्छ प्रतिमा हे त्यांचे बलस्थान आहे. अन्न, औषध, शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार, निवारा, परिवहन या मुलभूत मुद्यांवर ते कायम लक्ष वेधतात. भारतातील अडाणींच्या विरुद्धची त्यांची वक्तव्ये प्रसिद्ध आहेत.

एकेडी च्या जोशपूर्ण‌‌‌ भाषणाचे श्रीलंकन चहेते आहेत.

२०१९ ला पण एकेडींनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना किरकोळ टक्के मते पडली. पण ते हटले नाहीत. प्रश्नांशी जुळून राहीले. आर्थिक संकटात आलेला श्रीलंका व श्रीलंकन बाहेर कसे काढता येतील हाच ध्यास घेतला. याच फळीवर प्रामुख्याने त्यांचे काम असे.

यंदाच्या निवडणुकीत राजकीय विश्लेषकांनी एकेडीला विचारात घेतलेच नव्हते.निकालाने मात्र चक्रावून सोडले. श्रीलंकनांनी जबर धक्का दिला. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे सह ३९ उमेदवार रिंगणात होते. लोकांनी कौल मात्र एकेडी ला दिला.

चीनशी एकेडी ची वैचारिक संलग्नता आहे. पण, आता ते राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. देश सांभाळायचाय. भविष्य सांभाळायचेय. याचवर्षी आरंभाला एकेडी ने दिल्ली भेट दिलीय. पण तेव्हा ते देशप्रमुख नव्हते.

एक कळतेय. लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणारा नेता आवडतोय. जगात असे घडायला लागलेय. प्रारंभ झालाय !

 ० रणजित मेश्राम. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ढोल ताशांच्या गजरात प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे घोडपेठ येते जंगी स्वागत

Tue Sep 24 , 2024
– दिनेश चोखारे आणि अनिल धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थित चंद्रपूर :- काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेसह अन्य मान्यवर चंद्रपूर येथील विभागीय आढावा बैठकीला येत असतांना घोडपेठ येथे सर्व मान्यवरांचे दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर कृषी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com