मुंबई :- नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ४) संपन्न झाला.
यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.
कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.
व्हाईस ऍडमिरल निवासस्थानी स्वागत समारंभाला उपस्थिती
या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी ‘नेव्ही हाऊस’ येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ व चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निमंत्रित नौदल अधिकारी व माजी अधिकारी तसेच गणमान्य व्यक्तींना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह यांनी राज्यपालांना निमंत्रित मान्यवरांचा परिचय करून दिला.